*शिवसेनेचे माजी आमदार अशोक शिंदे काँग्रेसमध्ये.
*प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
यांनी केले पक्षात स्वागत.
*मनोहर जोशी सरकारमध्ये शिंदे होते राज्यमंत्री.
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
मुंबई: काँग्रेसम प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी
आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्धार केला असतानाच पक्षात इनकमिंगही जोरात
सुरू असून वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट मतदारसंघाचे
तीनवेळा आमदार राहिलेले माजी राज्यमंत्री व शिवसेना उपनेते अशोक
शिंदे यांनी शिवबंधन सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला
आहे.
मुंबईत काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष, आमदार, सर्व सेल व
विभाग प्रमुखांची बैठक पार पडली. यावेळी माजी राज्यमंत्री आणि माजी आमदार अशोक
शिंदे यांनी कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. माजी मुख्यमंत्री
पृथ्वीराज चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप,
प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, चंद्रकांत
हंडोरे, नसीम खान यावेळी उपस्थित होते. नाना पटोले यांनी
अशोक शिंदे यांचे पक्षात स्वागत केले. शिंदे यांच्या काँग्रेस प्रवेशाने वर्धा
जिल्ह्यात पक्ष भक्कम करण्यासाठी मदत होईल, असा विश्वास
पटोले यांनी व्यक्त केला. विविध पक्षांचे नेते काँग्रेसमध्ये येण्यासाठी इच्छूक
असल्याचा दावा करतानाच राज्यात तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस पक्ष
भक्कम करण्यासाठी सर्वांनी झटून काम करा, असे आवाहन यावेळी
पटोले यांनी केले. नाना पटोले यांनी टिळक भवन येथे राज्यातील कॉंग्रेस पक्षाच्या
सर्व मंत्र्यांसोबतही बैठक घेतली. मंत्र्यांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांनी
सविस्तर चर्चा केली, तसेच पक्ष विस्ताराकरिता आवश्यक त्या
सूचना त्यांनी सर्वांना केल्या.
रम्यान, अशोक शिंदे यांच्या काँग्रेस प्रवेशाने
सत्ताधारी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये पडद्यामागून फोडाफोडीचे राजकारण
सुरूच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोण आहेत अशोक
शिंदे?
अशोक शिंदे हे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट
मतदारसंघातून तीनवेळा शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले आहेत. १९९५, १९९९ आणि २००९ या निवडणुकांमध्ये ते
विजयी झाले. मनोहर जोशी यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात अशोक शिंदे हे
राज्यमंत्री होते. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत शिंदे यांचा भाजपच्या उमेदवाराकडून
पराभव झाला. दरम्यान, शिंदे हे शिवसेनेचे उपनेते म्हणून काम
पाहत होते. मात्र माजी खासदार अनंत गुढे यांच्याशी तीव्र मतभेद झाल्याने आणि
त्याबाबत पक्षातील वरिष्ठांकडे तक्रार करूनही त्याची दखल न घेतल्यानेच शिंदे यांनी
शिवबंधन सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
0 टिप्पण्या