लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
मुंबई: 'पबजी' या ऑनलाइन खेळाच्या नादी लागलेल्या १६ वर्षीय मुलाने तब्बल दहा
लाख रुपये गमावले. ही बाब आईवडिलांच्या लक्षात येताच त्यांनी त्यामुळे चांगलाच दम
भरला. यामुळे रागाच्या भरात घर सोडून पळालेल्या मुलाला गुन्हे शाखेच्या पथकाने
शोधून काढले.
जोगेश्वरी पूर्वेकडील दुर्गानगर परिसरात राहणाऱ्या
दास दाम्पत्याने २५ ऑगस्ट रोजी त्यांचा १६ वर्षीय मुलगा हरवल्याची तक्रार दिली
होती. मुलगा अल्पवयीन असल्याने एमआयडीसी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखा युनिट १० चे प्रभारी पोलिस निरीक्षक महेशकुमार ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक धनराज चौधरी, मुस्कान पथकातील जगदीश धारगळकर आणि दिलीप माने यांच्या पथकाने मुलाचा शोध
सुरू केला. मुलाचा स्वभाव, घरातील वादविवाद याबाबत दास
दाम्पत्यांकडून जाणून घेताना वेगळीच माहिती पोलिसांनी मिळाली. त्यांच्या मुलाला 'पबजी' खेळण्याची सवय जडली होती. गेमसाठी 'आयडी' आणि 'यूसी' प्राप्त करण्यासाठी त्याने आईच्या बँक खात्यामधून ऑनलाइन तब्बल दहा लाख
रुपये ट्रान्सफर केले. पैसे खर्च केल्याचे लक्षात आल्यावर आईवडील त्याच्यावर
संतापले. यामुळे रागाच्या भरात तो घरातू निघाला. ' मी घरातून
निघून जात आहे, परत कधीच येणार नाही' अशी
चिठ्ठी लिहून त्याने घर सोडले.
पोलिसांनी
आईवडिलांकडून हकीकत जाणून घेतल्यानंतर मुलाचे मित्र मैत्रिणीची माहिती तसेच
तांत्रिक पुराव्यांच्या आधारे त्याचा शोध सुरू केला. पोलीस पथकाकडून अविरत शोध
सुरू असताना दुसऱ्या दिवशी अंधेरी पूर्वेकडील महाकाली परिसरात हा मुलगा एकटाच फिरत असल्याचे
पोलिसांना दिसले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याचे समुपदेशन केले आणि पुढील
कारवाईसाठी त्याचा ताबा एमआयडीसी पोलिसांकडे देण्यात आला.
0 टिप्पण्या