Ticker

6/Breaking/ticker-posts

महाबळेश्वर-पाचगणी रस्त्यावर वाघांचा मुक्त संचार..!

 



लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

सातारा:सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात सक्रिय असणारे प्रसिद्ध उद्योजक व 'महिंद्रा अँड महिंद्रा'चे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. महाबळेश्वर-पाचगणी रस्त्यावर दोन वाघ फिरत असल्याचा हा व्हिडिओ आहे. खरोखरंच पाचगणीच्या रस्त्यावर वाघ फिरताहेत का, अशी चर्चा त्यावरून सुरू झाली आहे.

व्हिडिओ ट्वीट करताना आनंद महिंद्रा यांनी त्या व्हिडिओला एक मजेशीर कॅप्शन देखील दिलंय. '..तर हायवेवर केवळ आमची एक्सयूव्ही ही एकमेव बिग कॅट नाहीय. भन्नाट आहे हे...' असं महिंद्रा यांनी म्हटलंय. सोशल मीडियावर त्यामुळं तावातावानं चर्चा सुरू आहे. पाचगणीमध्ये खरंच रस्त्यावर वाघ फिरत आहेत का?, याची उत्सुकता नेटकऱ्यांना लागून राहिली आहे.

महिंद्रा यांनी ट्वीट केलेला व्हिडिओ १९ ऑगस्ट २०२१ चा आहे. त्या रात्री पाचगणीजवळच्या मार्गावर वाघ दिसल्याचं त्यांनी म्हटलंय. व्हिडिओत आधी एक वाघ रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झुडपातून बाहेर रस्त्यावर येतो. त्यानंतर लगेचच तो दुसऱ्या बाजूला उभ्या असणाऱ्या बाईकपर्यंत येऊन पुन्हा जिथून तो बाहेर आलेला त्या दिशेने जातो. दरम्यान, पहिला वाघ आला तिथूनच दुसरा एक मोठा वाघ बाहेर येतो. दोन वाघ पाहताच, ज्या गाडीतून हा व्हिडिओ शूट करण्यात आलाय, त्या गाडीतील प्रवासी प्रचंड घाबरतात आणि गाडी मागे घ्या, मागे... असं चालकाला सांगू लागतात. परंतु, चालक त्या प्रवाशांना शांत राहण्याचं आवाहन करतो, त्यांना गप्प करतो. प्रवासी शांत राहतात. काही वेळात हे वाघ देखील पुन्हा जंगलामध्ये माघारी फिरतात. महाबळेश्वर-पाचगणी पट्ट्यात अनेकदा आपल्याला बिबट्यासह वाघ दिसून येतात. येथूनच जवळ चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे. शिवाय, येथे कोयना वन्यजीव अभयारण देखील आहे. या पट्ट्यात वाघाबरोबरच बिबट्या, गवा, सांबर, हरीण, साळिंदर, लांडगा इत्यादी प्राणी देखील पाहायला मिळतात.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या