लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
अहमदनगर -भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक पद्मश्री डॉ . शियाली रामामृत रंगनाथन यांचे ग्रंथालय क्षेत्रांमध्ये भरीव योगदान आहे .त्यांनी ग्रंथालय शास्त्राचे पाच सिद्धांत सांगितले आहे त्यामध्ये ग्रंथ हे उपयोगासाठी आहे , प्रत्येक ग्रंथाला वाचक मिळाला पाहिजे, प्रत्येक वाचकाला त्याचा ग्रंथ मिळाला पाहिजे, ग्रंथालय व सेवक वाचकांचा वेळ वाचला पाहिजे, ग्रंथालय ही वर्धिष्णू आहे ही पंचसूत्री प्रत्येक ग्रंथालयाने आणि ग्रंथपालाने अवलंब केल्यास ग्रंथालय वाचकाभिमुख होईल असे प्रतिपादन न्यू आर्ट्स महाविद्यालयाच्या ग्रंथपाल प्रा. सौ संगीता निमसे यांनी केले .
त्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात आयोजित ग्रंथपाल दिन समारंभात बोलत होत्या ,त्या पुढे म्हणाल्या की ग्रंथपालांनी आणि ग्रंथालयांनी वाचकांच्या आवडीनुसार ग्रंथ ग्रंथालयात खरेदी केले पाहिजे. ग्रंथालयाचे संगणकीकरण केले पाहिजे त्यामुळे वाचक व सेवकांचा वेळ वाचेल .आपल्या कार्यालयाने ग्रंथालयाचे संगणकीकरण केले ही अभिनंदनीय व स्तुत्य बाब आहे .प्रारंभी डॉ.रंगनाथन यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला प्रा. सौ संगीता निमसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. ग्रंथपाल दिनानिमित्त सौ . निमसे यांचा ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर होते. त्यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना सांगितले की डॉ. रंगनाथन यांचे कार्य प्रत्येक ग्रंथपालासाठी प्रेरणादायी आणि महत्त्वाचे आहे भारतामध्ये ग्रंथालय चळवळ गतिमान करण्यासाठी विपुल लेखन केले.भारतात ग्रंथालय कायदे तयार करण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा आहे.त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतामध्ये ग्रंथालय शास्त्राची शास्त्र शुद्ध उभारणी केली. महाराष्ट्रामध्ये ही त्यांचे अनेक शिष्य कार्यरत होते त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये देखील ग्रंथालय शास्त्रामध्ये अमुलाग्र बदल झालेले आहे असे श्री. गाडेकर यांनी सांगितले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वागत, प्रास्ताविक तांत्रिक सहाय्यक हनुमान ढाकणे यांनी केले. आभार प्रदर्शन ग्रंथालय निरीक्षक रामदास शिंदे यांनी केले .यावेळी शैलेश घेगडमल आदींसह वाचक उपस्थित होते.
0 टिप्पण्या