लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन
खरगे यांच्या कार्यालयात उद्या दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षांच्या नेत्यांची
बैठक होणार असून, त्यात पेगॅसस प्रकरणी सरकारला चर्चेसाठी
कसे तयार करता येईल, यावर चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी
सांगितले. पावसाळी अधिवेशनाचा उद्या तिसरा आठवडा असून, सरकार संसदेचे अधिवेशन गुंडाळण्याचा निर्णय
घेण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये कामकाज सुरू होताच विरोधी पक्षांच्या सदस्यांनी हातात फलक घेत घोषणा देऊन कामकाजात व्यत्यय आणण्याचा प्रकार गेल्या तेरा दिवसांपासून अव्याहत सुरू आहे. राज्यसभेत बुधवारी विरोधी पक्षांच्या काही खासदारांनी बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न करताना प्रवेशदाराची काच फुटून एक महिला सुरक्षा अधिकारी जायबंदी झाल्याची माहिती राज्यसभेचे नेते पीयूष गोयल यांनी दिली. राज्यसभेचे कामकाज ११.३०, १२, २, ३ आणि ४ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
विरोधकांच्या गोंधळात राज्यसभेत अर्जुन मुंडा यांनी मांडलेले अरुणाचल प्रदेशातील अनुसूचित जमातींसाठी संविधान (अनुसूचित जमाती) आदेश दुरुस्ती विधेयक, भूपेंद्र यादव यांनी मांडलेले राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिसरातील वायू गुणवत्ता व्यवस्थापन आयोग विधेयक आणि संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी मांडलेले अत्यावश्यक संरक्षण सेवा विधेयक मंजूर करण्यात आले.
लोकसभेचे कामकाजही चार वेळा तहकूब करावे लागले. केंद्रीय विद्यापीठे (दुरुस्ती) विधेयक आणि कर कायदे (दुरुस्ती) विधेयक मांडल्यानंतर सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
0 टिप्पण्या