Ticker

6/Breaking/ticker-posts

'मी गँगस्टर होतो तर मग...'; नारायण राणेंचा शिवसेना नेतृत्वाला बोचरा सवाल

 








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

मुंबई: 'मी गँगस्टर होतो तर शिवसेनेने मला मुख्यमंत्री कसे केले होते?', असा सवाल करत केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी शिवसेना नेतृत्व आणि शिवसेनेच्या मुखपत्रावर जोरदार शब्दांत हल्ला चढवला. अटकेच्या कारवाईने राणे चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाप्रकरणी दाखल गुन्ह्यात नारायण राणे यांना काल दुपारी रत्नागिरीतील संगमेश्वर येथे अटक करण्यात आली. कालच रात्री रायगड जिल्ह्यातील महाड येथील कोर्टाने त्यांना सशर्त जामीन दिला. त्यानंतर मुंबईत परतलेल्या राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अधिक आक्रमकपणे शिवसेनेवर हल्ला चढवला.


शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून राणे यांच्या वागण्याचा समाचार घेण्यात आला आहे. 'केंद्रीय मंत्रिपदाची झूल अंगावर चढवूनही नारायण राणे हे एखाद्या छपरी गँगस्टरसारखेच वागत-बोलत आहेत', असा उल्लेख करत राणे यांच्यावर अग्रलेखातून तोफ डागण्यात आली आहे. त्याकडे लक्ष वेधले असता राणे यांनी जोरदार शब्दांत पलटवार केला व मी गँगस्टर होतो तर शिवसेनेने मला मुख्यमंत्री कसे केले?, असा सवाल केला. 

आता मंत्रिमंडळात जे शिवसेनेचे मंत्री आहेत त्यांनाही मग गँगस्टरच म्हणावे लागेल, असा टोलाही राणे यांनी लगावला. सामनात संजय राउत जे काही लिहितात ते फक्त उद्धव ठाकरे यांना खूश करण्यासाठी लिहित असतात. संपादक होण्याची त्यांची पात्रता नाही. १७ सप्टेंबरपर्यंत सगळ्या बाबी न्यायप्रविष्ट आहेत. त्यानंतर मी संजय राऊत यांच्यावर प्रतिक्रिया देईन. निश्चितच त्यांचं समाधान होईल, अशी माझी प्रतिक्रिया असेल, असा सूचक इशाराही राणे यांनी दिला.

तुम्ही कुणी माझं काहीही करू शकत नाही. तुमच्या कोणत्याही प्रतिक्रियेला मी घाबरणार नाही. तुम्हाला सर्वांना आतापर्यंत मी पुरून उरलो आहे, असे सांगतानाच शिवसेना जी वाढली आहे त्यात माझेही मोठे योगदान राहिलेले आहे. तेव्हा आताचे कुणीच नव्हते. माझ्याबद्दल अपशब्द बोलणारे पण नव्हते, असेही राणे म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या