लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
मुंबई पोलिसांपुढे एका निनावी फोनमुळे
आव्हानात्मक स्थिती निर्माण झाली आहे. रात्री ८ वाजून ५३ मिनिटांच्या सुमारास १००
नंबरवर बॉम्ब ठेवल्याबाबतचा फोन आला. या व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, भायखळा आणि
महानायक अमिताभ बच्चन यांचा बंगला अशा चार ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याचे
सांगितले. त्यानंतर माहितीचं गांभीर्य लक्षात घेत ज्या नंबरवरून हा कॉल आला होता
त्या नंबरवर पोलिसांनी लगेचच संपर्क साधला तेव्हा माझ्याकडे असलेली माहिती मी
तुम्हाला दिली आहे. आता मला डिस्टर्ब करू नका, इतकंच सांगून
त्या व्यक्तीने फोन ठेऊन दिला. त्यानंतर त्या व्यक्तीशी संपर्क होऊ शकलेला नाही.
त्याने फोन स्विच ऑफ करून ठेवला असून पोलिसांची डोकेदुखी त्यामुळे वाढली आहे.
निनावी
फोनबाबत माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने चारही ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.
संबंधित ठिकाणी बॉम्बशोधक पथकं दाखल करण्यात आली आहेत. गेल्या काही तासांपासून हे
सर्च ऑपरेशन सुरू असून अद्याप कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही. मुंबई
पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी या सर्च ऑपरेशनवर लक्ष ठेवून आहेत.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर मुंबई पोलिसांसोबतच
रेल्वे पोलीसही शोध घेत आहेत. टर्मिनसवरील तिकीट घर, वेटिंग
स्पेस, स्टॉल्स, फलाट अशा सर्व ठिकाणी
कोपरानकोपरा तपासण्यात आला आहे. काही भाग रिकामाही करण्यात आला होता. याबाबत मध्य
रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनीही माहिती दिली आहे.
प्रवाशांची गैरसोय होणार नाही अशापद्धतीने तपासणी करण्यात आली असून अजूनतरी
संशयास्पद असं काहीही आढळलेलं नाही, असं त्यांनी सांगितलं.
0 टिप्पण्या