लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
मुंबई- आपल्या बोलक्या डोळ्यांनी आणि निरागस चेहऱ्याने प्रेक्षकांवर मोहिनी घालणाऱ्या दिग्गज मराठमोळ्या अभिनेत्री जयश्री गडकर यांची आज २८ ऑगस्ट रोजी १३ वी पुण्यतिथी. २००८ साली जयश्री यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली होती. जयश्री यांनी मराठीप्रमाणे हिंदी चित्रपटातही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.
जयश्री यांनी अनेक चित्रपटात सोशिक पण तितक्याच कणखर स्त्रीची भूमिका साकारली. प्रत्येक मराठी गृहिणीसाठी जयश्री त्यांच्यातील एक होत्या. रामानंद सागर यांच्या 'रामायण' मध्ये जयश्री यांनी साकारलेल्या कौशल्या मातेच्या भूमिकेमुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. कर्नाटकमधील कारवार जिल्ह्यातील सदाशिवगड गावात एका सर्वसाधारण कोकणी घरात जन्मलेल्या जयश्री यांना नृत्य आणि गायन कलेची प्रचंड आवड होती. जयश्री पाच वर्षांच्या असताना त्यांचं कुटुंब मुंबईत आलं. जयश्री यांचं पुढील शिक्षण मुंबईत झालं.
इथे त्यांनी कथक नृत्याचं आणि सोबतच गायन कलेचं शिक्षण घेणं सुरुचं ठेवलं. जयश्री यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केलं. त्यांचा पहिला चित्रपट होता 'तमाशा.' फोटोग्राफर राम देवताळे यांनी एका समारंभात नृत्य करणाऱ्या जयश्री यांचा फोटो काढला आणि त्यांच्या स्टुडिओत लावला. राम यांच्या स्टुडिओत आलेल्या दिनकर पाटील यांनी जयश्री यांचे फोटो पाहून त्यांना 'दिसतं तसं नसतं' चित्रपटात नृत्य करण्याची संधी दिली.
0 टिप्पण्या