लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर मंगळवारी राज्यभरात
शिवसैनिक रस्त्यावर उतरले. मुंबईत जुहू इथं राणेंच्या घरासमोर जाऊन युवा सेनेच्या
कार्यकर्त्यांनी शिवसेनेवर टीका करणाऱ्या राणे पितापुत्रांना 'आवाज' दिला. या आंदोलनाची राज्यभर चर्चा होती.
आंदोलनानंतर रात्री युवा सेनेच्या प्रमुख शिलेदारांनी 'वर्षा'
बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व युवा सेनेचे प्रमुख
आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी या सर्वांना शाबासकी दिल्याचं
सूत्रांकडून समजतं.
राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून आणि
विशेषत: नारायण राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून राणे कुटुंबीय सातत्यानं
मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करत होते. नारायण राणेंच्या दोन्ही मुलांकडून ठाकरे
कुटुंबीयांवर वैयक्तिक टीका-टिप्पणीही केली जात होती. मात्र, ठाकरेंनी त्याकडं दुर्लक्ष करण्याचं
धोरण अवलंबलं होतं. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली
आवाज काढण्याच्या राणेंच्या वक्तव्यानंतर शिवसैनिकांचा संयम सुटला आणि आंदोलनं
सुरू झाली. युवा सेनेचे कार्यकर्ते यात आघाडीवर होते. युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांच्या
नेतृत्वाखाली मुंबईतील युवा सैनिकांनी राणे यांच्या जुहू येथील बंगल्यावर धडक
दिली. राणेंच्या घरासमोर उभं राहून सरदेसाई यांनी भाषण केलं व राणेंना आव्हान दिलं.
शिवसेनेत
शिवसैनिकच राहिले नाहीत. भाडोत्री लोकांना जमवून आंदोलन करावं लागतं... अशी टीका
राणे पितापुत्रांकडून शिवसेनेवर केली जायची. त्याला सरदेसाई यांनी उत्तर दिलं. ' स्वत:ला
सिंह म्हणवणाऱ्या उंदराच्या बिळासमोर आम्ही आलो आहोत. तुम्ही काय केलं?'
असा सवाल सरदेसाई यांनी केला. यावेळी समोर आलेल्या भाजपच्या
काही कार्यकर्त्यांना युवासैनिकांनी मारहाणही केली. त्यामुळं युवा सेनेच्या
कार्यकर्त्यांना पोलिसांच्या लाठ्याही खाव्या लागल्या. राणेंना जामीन मिळेपर्यंत,
रात्री उशिरापर्यंत युवा सेनेचे कार्यकर्ते जुहूमध्ये ठाण मांडून
होते. रात्री उशिरा प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. शिवसेना
स्टाइल आंदोलनाबद्दल मुख्यमंत्र्यांनी युवा सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांची पाठ
थोपटल्याचं सांगण्यात येतं.
0 टिप्पण्या