Ticker

6/Breaking/ticker-posts

'बाबासाहेब पुरंदरे यांना शुभेच्छा दिल्यामुळं सत्यजीत तांबे झाले ट्रोल'

 






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

अहमदनगर: युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची एक आठवण सांगणं चांगलंच महागात पडलं. बाबासाहेबांनी आवडीनं माझं नाव 'सर्जेराव' असं ठेवलं होत,’ अशी एक आठवण तांबे यांनी पुरंदरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सोशल मीडियातून सांगितली होती. त्यावरून पुरंदरेंना विरोध करणाऱ्यांकडून त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले. शेवटी तांबे यांनी एक दीर्घ पोस्ट लिहून खुलासा करीत ट्रोलला उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे आहे. पुरंदरे यांनी केलेली इतिहासाची मांडणी योग्य नसल्याचं माझंही मत बनलं आहे, असं सांगून यापूर्वीही अनेक समाजवादी नेत्यांनीही पुरंदरेंच्या कार्याचा गौरव केल्याचंही तांबे यांनी म्हटलं आहे.

गेल्या महिन्यात पुरंदरेंचा शंभरावा वाढदिवस होता. त्यानिमित्त त्यांना अनेकांकडून शुभेच्छा दिल्या जात होत्या. तांबे यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या. यासंबंधी ट्विट करताना तांबे यांनी म्हटले होते. लहानपणी मला थोर माणसांच्या सह्या गोळा करण्याची फार आवड होती. संगमनेरला ज्या अकोलकर वाड्यात माझा जन्म झाला, तिथं शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे कायम येत असत. तेव्हाच ही सही घेतलेली. बाबासाहेबांनी आवडीनं माझं नाव 'सर्जेराव' असं ठेवलं होतं. बाबासाहेबांना जन्मशताब्दीदिनी अनंत शुभेच्छा!असं म्हणत तांबे यांनी तो सही घेतलेला कागदही शेअर केला आहे. मात्र यावरून तांबे यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका सुरू झाली. अनेकांनी त्यांना छुपे संघी म्हटलं. खोटा इतिहास सांगणारे, जिजाऊंची बदनामी करणारे पुरंदरे तुम्हाला जवळचे कसे वाटतात? असे प्रश्न विचारणाऱ्या आणि यावरून ट्रोल करणाऱ्या अनेक प्रतिक्रिया तांबे यांच्या पोस्टवर आल्या. तीन-चार दिवसांपासून ही टीका सुरूच होती.

तांबे यांनी आज त्यावर सविस्तर उत्तर दिलं आहे. त्यांनी म्हटलं आहे, ‘सोशल मीडियात हल्ली कमीत कमी शब्दांत व्यक्त होण्याची आपल्याला सवय जडली आहे. पण वैचारिक परिपक्वता येण्यासाठी थोरामोठ्यांचे विचार, साहित्य अभ्यासणं गरजेचं असतं. आपल्यापेक्षा भिन्न विचारांचे लोकही आहेत, हे मान्य करून आपण त्यांच्या विचारांचाही अभ्यास करणं, ही खरं तर स्वतःची भूमिका तयार करण्याची पहिली पायरी असते. समाज माध्यमांमुळे जग वेगवान झालं असलं तरी ते पूर्ण अभ्यासानेच प्रकट व्हावं असं मला वाटतं. हरकत नाही, मी याआधीही अनेक ट्रोल्सना सामोरा गेलो आहे. मग ते नरेंद्र मोदींच्या पोस्टरवर काळं फासण्यावरून असो वा इतर काही कारणं असो. आज हे पत्र लिहिण्याचं कारण असं, की यावेळचे ट्रोल्स आपल्याच विचारधारेच्या लोकांकडूनही केले गेले. त्यांच्या भावनांचाही मी आदर करतो, पण विचार समजून न घेता केलेला विरोध केव्हाही वायाच जात असतो असं मला वाटतं.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या वयाचं शतक होत असल्याचं मला कळलं, आणि मी लहानपणी त्यांची सही घेतल्याची, त्यांनी मला 'सर्जेराव' नावाने हाक मारण्याची आठवण झाली. लहानपणीच्या या त्यांच्या प्रेमापोटी मी ट्विटरवर काही शब्दांत व्यक्त होत त्यांना शुभेच्छा दिल्या. मी स्वतः बाबासाहेब पुरंदरे यांच्या ऐतिहासिक लेखनाचे कधीच समर्थन केले नाही. पण त्यांच्या वयाचा आदर ठेवून त्यांना शुभेच्छा दिल्या. १९७४ मध्ये स्वतः यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या 'शिवसृष्टी' या शिवाजी पार्कमधील प्रदर्शनाला उपस्थित राहून दाद दिली होती. 


समाजवादी विचारांच्या पु. ल. देशपांडे यांनी अनेकदा बाबासाहेबांच्या कार्याची स्तुती लेखांतून केली आहे. त्यामुळे सुरुवातीच्या काळात मीही त्यांच्या लेखनाचा चाहता होतो, परंतु गेल्या दोन दशकांमध्ये नव्या इतिहासकारांनी केलेल्या मांडणीमुळे पुरंदरे यांनी केलेल्या इतिहासाच्या मांडणीतील दोष समोर आले आहेत. त्यांनी केलेली इतिहासाची मांडणी योग्य नसल्याचे माझेही मत बनले आहे. त्यामुळे पुरंदरे यांनी मांडलेल्या नव्हे, तर कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांनी मांडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा मी समर्थक आहे. परंतु विचारधारा जुळली नाही, म्हणून अनादर करणे मला मान्य नाही. कोणताही विचार टोकाला गेला की तो घातक बनतो, एवढी समज आजच्या काळात आपल्याजवळ असायला हवी, असं मला वाटतं,’ असं तांबे यांनी म्हटलं आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या