लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
मुंबईः रेस्टॉरंट व हॉटेल पूर्ण क्षमतेने सुरू
करण्याबाबत टास्क फोर्स सकारात्मक आहे. याबद्दल हॉटेल व्यावसायिकांनी समाधान
व्यक्त केले आहे. यासंबंधी आता राज्य सरकारने लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे.
रेस्तराँवरील निर्बंध कमी करण्यासंबंधी
टास्क फोर्सशी चर्चा करावी, अशी
मागणी हॉटेल व रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया (हारवी) यांनी मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री ठाकरे यांनी याविषयी
टास्क फोर्सशी चर्चा केली आहे व टास्क फोर्स याबाबत सकारात्मक आहेत, असे असोसिएशनने म्हटले आहे. याबाबत असोसिएशनचे अध्यक्ष शेरी भाटिया यांनी
सांगितले की, 'रेस्टॉरंटवरील निर्बंध कमी करण्याबाबत शिफारस
केल्याबद्दल डॉ. संजय ओक यांच्या नेतृत्वाखालील टास्क फोर्सचे आभार आहेत. आदरतिथ्य
क्षेत्रासाठी गेले काही महिने खूपच खडतर होते. त्यामुळे मुंबईतील हॉटेल आणि
रेस्टॉरंटसाठी हा मोठा दिलासा आहे. आता व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी सरकारच्या
औपचारिक घोषणेची प्रतीक्षा आहे.'
मुंबई
शहर व उपनगरात जवळपास ७५ हजार लहान-मोठे रेस्टॉरंट आहेत. ५ हजार मोठे रेस्टॉरंट
आहेत. ७५ हजारांपैकी ४० टक्के अर्थात सुमारे ३० हजार रेस्टॉरंट, धाब्यामागील लॉकडाउन व आताच्या निर्बंधांत बंद
पडले. या ३० हजार रेस्टॉरंटमधील किमान ३ लाख कर्मचारी, वेटर
बेरोजगार झाले आहेत. त्यानंतर उर्वरित हॉटेल व रेस्तराँ हिमतीने उभे होण्याचा
प्रयत्न करीत आहेत. पण त्यासाठी ते पूर्ण वेळ सुरू होण्याची गरज आहे, असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
0 टिप्पण्या