लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
अहमदनगर: अहमदनगरमधील रस्त्यांवर दुचाकीवरून फिरणारे
हे आहेत बाळासाहेब
लांडे.. चेहरेपट्टी लोकमान्य टिळकांसारखी. शिवाय टिळकांचे
स्वराज्याचे विचार पटलेले, त्यामुळे टिळकांसारखीच वेषाभूषा
ते करतात. टिळकांना अपेक्षित असलेले स्वराज्य अद्यापही मिळालेले नाही. जेव्हा
सार्वत्रिक निवडणुकीत पसंतीक्रमानुसार मतदानाची पद्धत येईल, तेव्हा
खरे स्वराज्य, असे लांडे मानतात. यासाठी सरकारी नोकरी सोडून
विविध पातळ्यांवर त्यांचा लढा सुरू आहे.
बाळासाहेब लांडे जलसंपदा विभागात नोकरीला
होते. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या विचाराने प्रभावित झाले.
त्यांच्यासोबत काही काळ काम केले. त्या काळात हजारे यांचा निवडणूक सुधारणांचा
मुद्दा त्यांना भावला. त्यात लांडे यांनी लक्ष घालून अभ्यास केला. त्याद्वारे ते
लोकमान्य टिळकांच्या स्वराज्य संकल्पनेवरही बोलू लागले. त्यांची चेहरेपट्टी
टिळकांशी मिळती जुळती, तोंडी
टिळकांचेच विचार, त्यामुळे मित्रमंडळींनी तुम्ही टिळकांसारखे
दिसता, असे म्हटले. त्यामुळे २०१३ पासून त्यांनी टिळकांसारखी
वेशभूषा केली. लोकांना ती आवडली. तेव्हापासून ते याच वेशभूषेत वावरतात. निवडणूक
सुधारणांचे आपले काम करता यावे, यासाठी त्यांनी सरकारी
नोकरीतून स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली. तेव्हापासून टिळकांच्या वेशभूषेत त्यांच्या
विचारांचा प्रसार करीत ते फिरत असतात. दुचाकीवरून जाताना नागरिक त्यांच्याकडे
कुतूहलाने पहातात. त्यांना कार्यक्रमांची निमंत्रणेही येत.
याबद्दल
सांगताना लांडे म्हणाले, ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी
मिळवीनच, अशी अलौकिक घोषणा लोकमान्य टिळकांनी केली होती.
त्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. मूठभर इंग्रज येथील बाणेदारपणाला घाबरून
पळून गेले. मात्र, स्वातंत्र्य मिळाले असले तरी खऱ्या
अर्थाने स्वराज्य मिळालेले नाही. त्याला कारण आपली सदोष निवडणूक पद्धत आहे.
त्यामध्ये बदल करण्यासाठी आमचा लढा सुरू आहे. सध्याच्या पद्धतीत केवळ बहुमताचा
उमेदवार विजयी होतो. ८० टक्के लोकांनी मतदान केलेले नसले तरीही तो त्यांचा
लोकप्रतिनिधी ठरतो. उमेदवार यादीतून एकाच कोणाची तरी निवड करावी लागते. ही पद्धत
बदलून पदवीधर मतदारसंघात असते तशी पसंतीक्रमानुसार मतदानाची पद्धत सर्वत्र आणली
पाहिजे. मात्र, आपला निवडणूक आयोग हे मनावर घेत नाही.
0 टिप्पण्या