लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
मुंबई : हवामानामध्ये
झालेल्या तीव्र बदलांचा शेतीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्याचे समोर आले आहे.
पाऊसमान, हवामान या बदलांमुळे शेतीच्या दृष्टीने
महत्त्वाच्या असलेल्या उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि
मराठवाड्यातील ११ जिल्ह्यांमध्ये पीकक्षेत्राला सर्वाधिक फटका बसला आहे. तर,
१४ जिल्ह्यांमध्ये याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. या जिल्ह्यांमधील
एकूण ७५ टक्क्यांहून अधिक शेती वातावरणातील बदलांमुळे संकटात आल्याचे भारतीय कृषी
संशोधन मंडळ आणि राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्था यांच्या संशोधनात आढळले आहे.
वातावरण
बदलामुळे ज्वारी, तांदूळ, गहू,
ऊस, कापूस, नाचणी,
काजू, जव आणि बाजरी या पिकांवर सर्वाधिक
परिणाम होऊ शकतो, असा इशारा या अभ्यासातून देण्यात आला आहे. सध्या चालू हंगामात आलेल्या उडीद,मग, सोयाबीन व तुरीवर मोठ्या प्रमाणात रोग पड ल्याने फवारणी करता - करता शेतकरी मेटाकुटिला आले आहेत.
शेतीवर परिणाम होत असलेल्या जिल्ह्यांपैकी अनेक जिल्हे हे पठारी प्रदेशातील आहेत.
औरंगाबाद, बुलढाणा, जालना, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशीम, अकोला आणि
अमरावती यांचा यात समावेश असून येथे राज्यातील २२.२२ टक्के पीक उत्पादन होते.
विदर्भाच्या मध्यवर्ती भागाचा यामध्ये ६.७८ टक्के हिस्सा असून, तोही सर्वाधिक आघातप्रवण असल्याचे आढाव यांनी सांगितले. वातावरण बदलामुळे
शेतीवर होणारे परिणाम हे पालघर, ठाणे, रायगड,
नाशिक, सातारा, कोल्हापूर,
अहमदनगर, नागपूर आणि पुणे या नऊ जिल्ह्यांवर
किमान प्रमाणात असतील.
अभ्यासक चैतन्य आढाव यांनी यासंदर्भात संशोधन केले आहे. यामध्ये कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचाही समावेश आहे. सोशिओ-इकॉनॉमिक व्हल्नरेबिलिटी टू क्लायमेट चेंज-इंडेक्स डेव्हलपमेन्ट अँड मॅपिंग फॉर डिस्ट्रिक्ट्स इन महाराष्ट्र या संशोधनातून वातावरणातील तीव्र बदलांमुळे उपजीविका आणि शेती आधारित अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आढाव यांनी भारतीय कृषी संशोधन मंडळ, भारतीय गहू आणि जव संशोधन संस्थेचे डॉ. आर. सेंधील यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या हा शोधनिबंध सादर केला आहे. यासाठी राज्यातील ३४ जिल्ह्यांसाठी ४४ निर्देशकांच्या आधारे यासंदर्भातील माहिती संकलित करण्यात आली आहे. मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यांचा समावेश या अभ्यासात नाही.
उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्हा हा चक्रीवादळे, पूर, बदलते पाऊसमान आणि तीव्र तापमानामुळे पिकांसाठी सर्वाधिक आघातप्रवण आहे. त्याशिवाय मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, परभणी आणि हिंगोली, विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती आणि वाशिम हे इतर जिल्हे अधिक प्रमाणात आघातप्रवण, संवेदनशील असल्याचे या आढाव यांनी सांगितले. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद आणि विदर्भातील यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली हे इतर १४ जिल्हे मध्यम स्वरूपात आघातप्रवण असल्याचेही या अभ्यासातून समोर आले आहे
राज्यातील एकूण लोकसंख्येच्या ५१ टक्के
लोकसंख्या ही आर्थिक उत्पन्नासाठी शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे शेतीवर होणाऱ्या
परिणामांच्या दृष्टिकोनातून या लोकसंख्येच्या उत्पन्नावरही परिणामाची भीती आहे.
यासाठी तातडीने धोरणे ठरवणे आवश्यक आहे, असे अभ्यासक स्पष्ट करतात. वातावरण बदलामुळे भविष्यात शेतीवरील परिणामांची
आगाऊ इशारा देणारी यंत्रणा गावपातळीवर सुरू करणे गरजेचे आहे.
0 टिप्पण्या