*सत्तेच्या दबावाला बळी पडून ट्वीटरने भूमिका ठरवू नये!
*पीडित कुटुंबाच्या पाठीशी
उभे राहणे हा गुन्हा आहे का?
*महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विचारला सवाल.
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
मुंबई: 'ट्वीटर हे आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले समाज माध्यम आहे. सत्तेच्या
दबावाला बळी पडून ट्वीटरने आपल्या भूमिका ठरवू नयेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी
राज्यघटनेच्या माध्यमातून आम्हाला जे विचार स्वातंत्र्य दिले आहे, त्याची ही मुस्कटदाबी आहे', असे नमूद करत ट्वीटरच्या कारवाईचा काँग्रेस विधिमंडळ
पक्षनेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निषेध
केला आहे. लोकशाहीच्या हितासाठी यापुढेही आवाज उठवत राहू, लढू
आणि संघर्ष करू, असेही थोरात यांनी पुढे म्हटले आहे.
ट्वीटरच्या भूमिकेवर बाळासाहेब थोरात
यांनी संताप व्यक्त केला. ‘ ट्वीटर
इंडियाने माझे ट्वीटर हॅण्डल लॉक केले. कारण काय तर म्हणे राहुल गांधी यांना समर्थन करणारे ट्वीट केले
म्हणून! मूळात राहुल गांधी हे लढवय्ये नेते आहेत. नीडर होऊन ते सामान्य जनतेच्या
सोबत उभे राहतात, त्यांचा आवाज बनतात. राहुल यांचा आवाज
दाबण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. खरेतर ट्वीटर हे समाजमाध्यम आहे, तेथे आपण आपले मत मांडू शकतो. लोकशाहीमध्ये हा मत मांडण्याचा अधिकार
आम्हाला मिळालेला आहे. आमचे नेते राहुल गांधी आणि आम्ही काँग्रेसजन ट्वीटरच्या
माध्यमातून जनतेच्या हिताच्या प्रश्नांवर आवाज उठवत होतो', असे
सांगत थोरात यांनी ट्वीटरच्या कारवाईवर आक्षेप घेतला
'ट्वीटरने आधी राहुल गांधी यांचे अकाऊंट लॉक केले आणि आता काँग्रेस
पक्षाच्या अधिकृत आयएनसी इंडिया (INCIndia) आणि आयएनसी
महाराष्ट्र (INCMaharashtra) या हॅण्डलसह अनेक काँग्रेस नेते
आणि कार्यकर्त्यांची हॅण्डल लॉक केली. आम्ही देशविघातक, धार्मिक
द्वेष वाढविणारे किंवा जातीय तेढ निर्माण करणारी मते मांडलेली नाहीत. एका पीडित
कुटुंबाच्या पाठीशी उभे राहणे हा काय गुन्हा आहे का?', असा
सवालही थोरात यांनी विचारला आहे.
दरम्यान, काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांचे ट्वीटर अकाउंट लॉक
केल्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस पक्ष, महाराष्ट्र प्रदेश
काँग्रेस पक्षासह देशभरातील काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व
कार्यकर्ते यांची ट्वीटर अकाउंट लॉक करण्यात आली आहेत. ट्वीटरची ही कारवाई
पक्षपातीपणाची असून केंद्रातील मोदी सरकारला जाब विचारणारे ट्वीट करून जेरीस
आणल्यामुळेच मोदी सरकारच्या दबावाखाली ट्वीटरने ही कारवाई केली आहे, असे नमूद करत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यानी या कारवाईचा निषेध केला आहे. काँग्रेस पक्ष कोणत्याही दबावापुढे न
झुकता लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी आवाज उठवतच राहील, असे
ते म्हणाले.
0 टिप्पण्या