Ticker

6/Breaking/ticker-posts

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊनची शक्यता आहे का? राष्ट्रवादीच्या मंत्र्याने दिलं थेट उत्तर

 








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

अहमदनगर : राज्यात करोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. या पार्श्वभूमीवरच पुन्हा निर्बंध कडक होणार का, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. याबाबत राष्ट्रवादीचे नेते आणि आपत्ती निवारण विभागाचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी स्पष्ट माहिती दिली आहे.

' प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या ग्रामीण रुग्णालयाचे विस्तारीकरण करण्यात आले आहे. त्या ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात आले आहेत. दुसऱ्या लाटेतून जे अनुभव आले, ते लक्षात घेऊन सज्जता ठेवण्यात आली आहे. राज्यातील निर्बंध आता शिथील करण्यात आलेले आहेत. तरीही नागरिकांनी काळजी घ्यायची आहे. राज्यात पुरेशा ऑक्सिजनची सोय करण्यात आली आहे. केंद्राकडून जास्तीचा ऑक्सिजन मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे ज्यावेळी राज्याची ऑक्सिजनची गरज ७०० टनावर जाईल, त्या दिवसापासून पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत,' असं मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी म्हटलं आहे.

नागरिकांनी सहकार्य केल्यास सर्वांच्या मदतीने या संकटावर मात करणे शक्य होणार आहे. सरकारी यंत्रणा सतर्क राहून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, असंही ते म्हणाले.

'...म्हणून मुख्यमंत्र्यांबद्दलचा आदर द्विगुणित झाला'

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबद्दल आदर होताच. करोनाच्या काळात त्यांनी जी सावधपणे पावले उचलली त्यामुळे त्यांच्याबद्दलचा माझ्या मनातील आदर द्विगुणित झाला आहे,’ अशा शब्दांत राष्ट्रवादीचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयांचे स्वागत केले.

करोनाची परिस्थिती आणि उपाययोजना यासंबंधी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना तनपुरे बोलत होते. ते म्हणाले, ‘मुख्यमंत्री करोनाच्या बाबतीत अत्यंत सावधगिरीने पावले उचलत आहेत. काही राजकीय पक्ष यामध्येही राजकारण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. विरोधक काहीही टीका करीत असले तरी लोकांसाठी काय महत्त्वाचे आहे, याचा विचार करून मुख्यमंत्री संयमाने परिस्थती हातळत आहेत. लोकांचे जीव वाचविण्यासाठी काय करता येईल, याचे निर्णय ते परिस्थितीचे भान राखून घेत आहेत. त्यामुळे माझा मुख्यमंत्र्याबद्दलचा आदर द्विगुणित झाला आहे.'

दरम्यान, नगर जिल्ह्यात पावसाने ताण दिल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत, त्यासंबंधी बोलताना ते म्हणाले, ‘यासंबंधी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी लक्ष घातलं आहे. परिस्थितीची पाहणी करून योग्य तो निर्णय घेतला जाईल. मात्र, हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार एक-दोन दिवसांत चांगला पाऊस अपेक्षित आहे. त्यानुसार पाऊस झाला तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल,’ असंही प्राजक्त तनपुरे म्हणाले. राज्यमंत्री तनपुरे  राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचे आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या