Ticker

6/Breaking/ticker-posts

महाराष्ट्राला 'झिका'चा धोका? ; केंद्राचे पथक तातडीने पुण्यात..

 *महाराष्ट्रात झिकाचा रुग्ण आढळल्यानंतर यंत्रणा सतर्क.

*केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या तज्ज्ञांचे पथक पुण्यात दाखल.

*बेलसरमध्ये जाण्याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चेनंतर निर्णय घेणार.








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

पुणे: पुणे  जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे झिकाचा रुग्ण आढळल्याने स्थानिक परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या तज्ज्ञांचे पथक पुण्यात आज सांयकाळी दाखल झाले. हे पथक आरोग्य विभागातील तज्ज्ञांशी उद्या चर्चा केल्यानंतर बेलसर येथे जाण्याबाबत निर्णय घेणार आहे.


पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे एका ५० वर्षीय महिलेला झिकाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने बेलसरसह पाच गावांमध्ये सर्व्हेक्षण सुरु केले आहे. अनेक जणांच्या रक्ताचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी  (एनआयव्ही) यांच्याकडे पाठविले. त्यातील काही जणांच्या अहवालात चिकूनगुनिया, डेंगीची लागण झाल्याचे निदान झाले. उर्वरीत चाचण्यांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.

दरम्यान, केंद्राच्या पथकात दिल्ली येथील भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेच्या राष्ट्रीय हिवताप संशोधन संस्थेतील कीटकतज्ज्ञ डॉ. हिंमत सिंग, दिल्ली येथील लेडी हार्डिंग वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ प्रा. डॉ. शिल्पी नैन आणि विमानतळ आरोग्य अधिकारी प्रणील कांबळे यांचा समावेश आहे. उद्या दिवसभर हे पथक अधिकाऱ्यांसोबत आढावा घेणार आहे.

केंद्राचे पथक मध्यवर्ती शासकीय इमारतीमध्ये सकाळी नऊ वाजता राज्याच्या आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांच्यासोबत बैठक घेणार आहेत. सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांच्यासोबत बैठक घेऊन आढावा घेणार आहेत. साडेअकरा वाजता आरोग्य उपसंचालक यांच्यासोबत बैठक होणार आहे. यावेळी आरोग्य विभागाशी संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित रहाणार आहेत तर दुपारी एक वाजता राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था अर्थात एनआयव्हीचे शास्त्रज्ञ डॉ. योगेश गुरव यांच्यासोबत बैठक होणार आहे, असे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या