लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
कर्जत: राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित
पवार यांच्याशी जवळीक साधलेल्या
भाजपच्या पदाधिकाऱ्याचा पक्षाने राजीनामा घेऊन तो तडकाफडकी मंजूरही करण्यात आला
आहे.
कर्जत येथील भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर यांनी त्यांच्या खासगी
संस्थेत रोहित पवार यांना निमंत्रित करून एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यानंतर
दोन दिवसांतच ही कारवाई झाली आहे. आता ढोकरीकर पुढे काय भूमिका घेणार, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. कर्जत नगरपंचायत निवडणुकीच्या
पार्श्वभूमीवर ही घडामोड लक्षणीय ठरत आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी ढोकरीकर यांचा
राजीनामा मंजूर केल्याचे कळवलं आहे. या मतदारसंघात आतापर्यंत भाजपच्या अनेकांनी
राष्ट्रवादीत प्रवेश केला. मात्र, त्यावेळी पक्षाने अशी तडकाफडकी भूमिका घेतली नव्हती. ढोकरीकर यांच्या
बाबतीत मात्र पक्षाने खूपच गांभीर्याने आणि तडाफडकी पावले उचलल्याने हा प्रकार
पक्षाच्या जिव्हारी लागल्याचे दिसून येते.
भाजपतर्फे
प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, प्रसाद बापुसाहेब ढोकरीकर यांनी जिल्हा संघटन
सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. कौटुंबिक जबाबदारी व आजारपणामुळे जिल्हाभर
प्रवास करणे जमणार नाही, असे सांगून त्यांनी राजीनामा दिला
असून त्यांच्या विनंतीनुसार प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या परवानगीने
तो मंजूर करण्यात आला आहे. त्यांना या पदावरून आजपासून कार्यमुक्त करण्यात येत आहे,
असेही मुंडे यांनी म्हटलं आहे.
मात्र, यामागे खरे कारण ढोकरीकर यांनी आमदार पवार यांच्याशी साधलेली जवळीक
असल्याचे सांगण्यात येते. ढोकरीकर यांचे कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू गावात
धाकोजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आहे. या विद्यालयामध्ये व्यायाम
शाळा उभारण्यात आली आहे. त्याचे उद्घाटन आमदार रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात
आले होते. ढोकरीकर पूर्वी माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांचे निकटवर्तीय समजले
जात. मात्र या कार्यक्रमास त्यांनी शिंदे यांना निमंत्रित केले नव्हते. उलट
राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाची
मोठी चर्चा झाली. त्यानंतर भाजपकडून पुढील हालचाली झाल्या.
रोहित पवार
यांनी कर्जत आणि जामखेड तालुक्यात आतापर्यंत भाजपसह इतर पक्षांतील कार्यकर्त्यांना
राष्ट्रवादीत आणण्यात यश मिळवलं आहे. ढोकरीकर हे तालुक्यातील भाजपच्या दुसऱ्या
फळीतील सक्रीय कार्यकर्ते होते. निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये त्यांची गणना होत
असे. जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशीही त्यांचे संबंध
आहेत. असे असूनही ढोकरीकर यांना आपलेसे करण्यात पवार यांना यश आल्याचे मानले जात
आहे. ढोकरीकर किंवा राष्ट्रवादी यांच्याकडून पक्षप्रवेशासंबंधी अद्याप कोणतीही
भूमिका जाहीर केलेली नाही. मात्र, कर्जत नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी ही
तयारी सुरू केल्याचं बोललं जात आहे.
0 टिप्पण्या