लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
मुंबई: 'हॅलो, मी शरद पवार बोलतोय', असा शरद पवार यांचा हुबेहूब आवाज
काढत एका व्यक्तीने मंत्रालयात फोन केल्याने सगळेच चक्रावून गेले. प्रशासकीय
अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत बोलून संबंधित व्यक्तीने फोन ठेवून दिला. मात्र,
त्यानंतर खरंच हा फोन शरद पवार यांनी केला होता का, याची पडताळणी करण्यात आली आणि त्यातून धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
याप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी करण्यात येत
असल्याचे सांगण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ
नेते शरद पवार यांचा आवाज काढत सदर व्यक्तीने मंत्रालयात फोन केला. मी सिल्व्हर ओक निवासस्थान येऊन बोलतोय, असे म्हणत या व्यक्तीने फोन घेणाऱ्या अधिकाऱ्यासोबत बदल्यांसदर्भात चर्चा
केली. दरम्यान, या कॉलबाबत शंका वाटल्याने खातरजमा
करण्यासाठी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सिल्व्हर ओक येथे कॉल केला. त्यावर
साहेबांनी असा कोणताही कॉल केलेला नाही, असे तिथून सांगण्यात
आले. त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत याबाबत पोलिसांना खबर देण्यात आली.
मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने
याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्याआधारे पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा
गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. तीन ते
चार दिवसांपूर्वी हा फोन आला होता. बदल्यांबाबत बोलताना काही जमीन व्यवहारासंबंधी
फाइलवर शेरा मारण्यास सदर व्यक्तीने सांगितल्याचेही सांगण्यात येत आहे.
0 टिप्पण्या