Ticker

6/Breaking/ticker-posts

नादच खुळा ! पोळ्यासाठी घेतली साडेतीन लाखांची खिल्लारी बैलजोडी

 








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

अहमदनगरः शेतीचे यांत्रिकरण झाल्याने बहुतांश कामे बैलांऐवजी ट्रॅक्टर व अन्य यंत्राद्वारे केली जातात. बैल सांभाळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही कमी होत आहे. म्हणूनच आता काही ठिकाणी ट्रॅक्टरचा पोळाही साजरा केला जातो. असे असले तरी बैलांवर प्रेम करणारे हौशी शेतकरी कमी नाहीत. शेतातील कामासाठी नव्हे पण खास पोळ्यासाठी आणि दावणीला खिलार जोड असावी असे मानणारे शेतकरीही आहेत. नगरमधील बैलप्रेमी डागवाले परिवाराने यावर्षी पोळ्यासाठी अशीच सुमारे साडेतीन लाखांची सुंदर खिलार जातीची बैलजोडी खरेदी केली आहे. पोळ्याआधीच सजवून- धजवून ही जोडी घरी आणण्यात आली.

नगर महापालिकेतील माजी नगरसेवक किशोर डागवाले कुटुंबीय शेतीतही अग्रेसर आहे. त्यांना बैल जोडी पाळण्याची हौस आहे. दरवर्षी त्यांच्याकडे पोळा उत्साहात साजरा केला जातो. त्यांच्याकडे दिमखादार बैलांची पूजा आणि मिरवणूक पाहण्यासारखी असते. यावर्षी करोनामुळे पोळ्याच्या सार्वजनिक मिरवणुकीला बंधने आहेत. मात्र, पूजा आणि घरगुती सण तर होणारच. यासाठी डागवाले कुटुंबायांनी पंढरपुरी खिलार जातीची बैलजोडी विकत घेतली. ही सातफुटी सुंदर बैलजोडी त्यांनी सुमारे साडेतीन लाख रुपयांना खरेदी केली आहे. जिल्ह्यातील ही सर्वात मोठी, सुंदर व सुबक बैल जोडी असल्याचा दावा डागवाले परिवाराने केला आहे. जेऊर बायजाबाईचे येथील प्रगतशील शेतकरी पांडुरंग बेरड यांच्याकडून डागवाले यांनी ही सर्जा-राजाची जोडी विकत घेतली. सजवून-धजवून ही जोडी त्यांनी घरी आणली आहे. यावेळी किशोर डागवाले, राजू लेंडकर, अनिल शिंदे, गोरख डागवाले, सुनील सूर्यवंशी उपस्थित होते.

यासंबंधी रोहित डागवाले म्हणाले, 'खिल्लार बैलांची जात ही नामशेष होत चालली आहे. अनेक वर्षांपासून डागवाले कुटुंब जातीवंत खिल्लार बैलांचे व देशी गोवंशाचे संवर्धन व संगोपन करत आलेले आहे. बैल पोळा जवळ आला आहे त्यासाठीच जिल्ह्यातील सर्वांत मोठी, सुंदर व सुबक सर्जा- राजाची बैल जोडी खरेदी केली आहे.' या जोडीचे मूळ मालक पांडुरंग बेरड म्हणाले, 'पंढरपुरी जातीवंत बैलांना आम्ही पोटाच्या मुलांप्रमाणे वाढवले आहे. आतापर्यंत त्यांनीच आम्हाला सांभाळले आहे.' असं म्हणत त्यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी आपल्या लाडक्या बैलजोडीना निरोप दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या