लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
अहमदनगर: ‘राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारकडून
पोलिसांना हाताशी धरून राजकीय दहशतवाद निर्माण केला जात आहे. गृह विभागातील राजकीय
हस्तक्षेप फक्त अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्यासाठी होत असून, या
विभागात आणखी किती वाझे शिल्लक आहेत, हे शोधण्याची वेळ आता
आली आहे,’ अशी टीका भाजपा नेते, माजी
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सूडबुद्धीने
केलेल्या अटकेचा निषेध करण्यासाठी विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिर्डीत आंदोलन
करण्यात आले. यावेळी पोलिसांच्या कारवाईवर आक्षेप घेण्यात आला. विखे पाटील म्हणाले, 'नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी ज्या पद्धतीने
अटकेची कारवाई केली ते पाहाता अधिकारीही आता राज्यकर्त्यांच्या दबावात काम करू
लागले आहेत असे दिसते. नियमांच्या बाहेर जाऊन केलेल्या या कृतीबद्दल आयुक्तांना
तातडीने निलंबित करण्यात यावे. राणे यांना अटक करून आम्ही पाहिजे तसे काही करू
शकतो, या सरकारच्या मनमानी कारभाराला न्यायालयाने चपराक दिली
आहे. मागील दोन वर्षांपासून या सरकारचा फक्त गृहविभाग चर्चेत आहे. अधिकाऱ्यांना
हाताशी धरून सामान्य माणसांवर दहशत निर्माण करण्यासाठी या विभागात अजून किती वाझे
शिल्लक आहेत हे शोधण्याची वेळ आली आहे,' असेही विखे पाटील
म्हणाले.
विधान
परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनाही विखे पाटील यांनी इशारा दिला, ते म्हणाले, 'विधान
परिषदेचे उपसभापती पद हे घटनात्मक आहे. तरीही त्या पदावर विराजमान असलेल्या
शिवसेनेच्या नेत्या राजकीय वक्तव्य करीत आहेत. त्यांनी प्रथम आपल्या पदाचा
राजीनामा द्यावा, नाहीतर आम्हाला यासाठी न्यायालयीन लढाई
लढावी लागेल. तुमच्याकडून झालेली टीका आणि दसरा मेळाव्यातील भाषणाच्या जुन्या
रेकॉर्ड काढून कारवाई करण्याची मागणी आम्हाला करावीच लागेल, असा इशाराही विखे पाटील यांनी शिवसेनेला दिला.
प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना मागण्यांचे निवेदन
देण्यात आले. राणे यांना झालेल्या अटकेची चौकशी करावी, संबधितांवर कारवाई करावी. सुडबुद्धीने
दाखल केलेले गुन्हे तातडीने मागे घ्यावेत, राज्यातील
भाजपच्या कार्यकर्त्यांवर आणि कार्यालयांवर हल्ले करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे
दाखल करावेत, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
0 टिप्पण्या