Ticker

6/Breaking/ticker-posts

पारनेरमध्ये करोना का वाढला ?; भाजपचा रोख राष्ट्रवादीच्या आमदाराकडे

 *पारनेर तालुक्यात करोना रुग्णसंख्येत वाढ

*भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा लोकप्रतिनिधींवर आरोप

*भाजपचा रोख आमदार नीलेश लंके यांच्याकडं







लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

पारनेर: ‘कडक निर्बंध लागू असतानाही पारनेर तालुक्यात इतके दिवस सर्वच राजकीय पक्षांचे कार्यक्रम झाले. करोनाचा प्रसार होण्यामागे लोकप्रतिनिधीच जबाबदार आहेत. त्यांच्यावर प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नाही. मात्र, व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवून अडचणीत आणले जात आहे. तालुक्यातील करोना परिस्थिती जाणीवपूर्वक गंभीर केली जात आहे,’ असा आरोप पारनेर तालुका भाजपचे अध्यक्ष वसंत चेडे यांनी केला आहे.

गेल्या काही काळापासून पारनेर तालुक्यात करोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे प्रशासनाने बहुतांश गावांत कडक निर्बंध लागू केले आहेत. या पार्श्वभूमीवर चेडे यांनी हा आरोप केला आहे. त्यांनी कोणाचेही नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांच्याकडे असल्याचे दिसून येते. कोविड सेंटर आणि सरकारी रुग्णलयांतील निधीसंबंधीही त्यांनी गंभीर आरोप केले आहेत.


चेडे यांनी म्हटले आहे, ‘तालुक्यात लोकप्रतिनिधी मोकाट आहेत. प्रशासन त्यांच्याच थाटात आहे. सामान्य जनतेला वेठीस धरण्याचा पोरखेळ सध्या सुरू आहे. तालुक्यातील करोना परिस्थिती जाणीवपूर्वक गंभीर केली जात आहे. तालुक्यात सध्या सर्वाधिक चाचण्या होत आहेत. तालुक्यात कोविड सेंटर चालविण्यासाठी आटापिटा सुरू आहे. सरकारी रुग्णालयात जागा असतानाही कोविड सेंटरमध्ये दबावाखाली रुग्णाची भरती कशासाठी? यावरून शासकीय यंत्रणा सक्षम नसल्याचे दिसत आहे. सरकारी रुग्णालयांना कोविडसाठी येणारा निधी कुठे वापरला जातो, याचे उत्तर द्यावे. तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी तालुक्यात सर्व ठिकाणी पोरखेळ मांडलेला आहे. आमदार, सभापती, बांधकाम सभापती, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांनी पाहणी करून तालुक्यातील बहुतांश गावांत १० तारखेपर्यत लोकांनी स्वत: होऊन बंद पाळल्याचे सांगत आहेत. मात्र, इतके दिवस सर्व राजकीय पक्षांचे कार्यक्रम सुरू आहेत. पारनेर तालुक्यात खरा करोना या लोकप्रतिनिधीनी वाढविलेला आहे. त्यांच्यावर प्रशासनाचे कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नाही. तालुक्यातील जनता वाऱ्यावर सोडलेली आहे,’ असेही चेडे यांनी म्हटले आहे.

चेडे यांनी पुढे म्हटले आहे, ‘प्रशासनही संभ्रम अवस्थेत आहे. मुंबई, ठाणेसारख्या मोठ्या शहरांमध्ये रात्री १० वाजेपर्यत दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश झालेले आहेत. हे सरकार दारूची दुकाने सुरू ठेवून मंदिरे मात्र बंद ठेवत आहे. इतर अनेक व्यवहारांनी परवानगी आहे. त्यामुळे करोना फक्त सामान्य दुकानदारांच्या मुळावर आहे की काय, असा प्रश्न पडतो. प्रशासन दुकानदारांना चोरासारखी वागणूक देत आहे. पारनेर तालुक्यात कोठेही मोठी बाजारपेठ नाही. आहे ती बाजारपेठ उद्ध्वस्त करण्याचे पाप लोकप्रतिनिधी व प्रशासन मिळून करत आहे. दुकाने बंद असल्याने दुकानात काम करणारे कामगार, त्यांच्यावर अवलंबून असणारे इतर घटक यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या