लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
पुणे: दौंड तालुक्यातील कासुर्डी येथील आयडीबीआय बँकेच्या एटीएम मधून ११ लाख ५८ हजार रुपयांची
रोकड चोरीस गेली होती. हा गुन्हा उघडकीस आणण्यात पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक
गुन्हे शाखेला (एलसीबी) यश आले आहे. बँकेतच काम करणाऱ्या ऑफिसबॉयने एटीएम मशीन
उघडण्याचा पासवर्ड मित्रांना सांगून हा गुन्हा केल्याचे समोर आले आहे.
दौंड तालुक्यातील कासुर्डी येथे असलेल्या
आयडीबीआय बँकेचे एटीएम मशीन उघडून त्यातील ११ लाख ५८ हजार रुपये चोरण्यात आले
होते. १४ ते २३ ऑगस्ट दरम्यान हा प्रकार घडला होता. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात
गुन्हा दाखल होता. परिसरात सीसीटीव्ही देखील बंद असल्यामुळे आरोपीचा माग लागत
नव्हता. पुणे ग्रामीणचे अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली
एलसीबीचे निरीक्षक अशोक शेळके यांच्या पथकाने आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली.
त्यावेळी बँकेतील सर्वांकडे चौकशी करण्यात आली. संशयावरून ऑफीसबॉय भोसेकर
याच्याकडे चौकशी केली असता त्याचे बिंग फुटले. त्याला एटीएम मशीन उघडण्याचा
पासवर्ड माहिती असल्याचे त्याने सांगितले. तसेच, त्याने तो पासवर्ड त्याचे मित्र चव्हाण व ढवळे यांना दिला.
१६ ऑगस्टच्या रात्री एटीएम मशीनची लाइट बंद करून पासवर्ड टाकत पत्रा काढला.
त्यानंतर मशीनची तोडफोड करून पैसे चोरल्याची कबुलीही त्याने दिली. त्यानुसार तपास
करून चव्हाण याला देखील अटक करण्यात आली. फरार आरोपीचा शोध सुरू आहे.
0 टिप्पण्या