लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
नवी दिल्लीः केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना
उधाण आलं असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे संघटन
महामंत्री बी. एल. संतोष यांच्यासोबत घेतली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराला
अंतिम स्वरुप दिलं गेलं. पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी ही बैठक झाली. अनेक तास
ही बैठक चालली. यामुळे मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार हा बुधवारी होण्याची शक्यता
आहे. बुधवारी मंत्र्यांचा शपथविधी होईल, असं काही सूत्रांचं म्हणणं आहे. पण याबाबत अद्याप कुणीही अधिकृत दुजोरा
दिलेला नाही. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास मे २०१९ मध्ये दुसऱ्यांदा पंतप्रधान
झाल्यावर PM मोदींच्या मंत्रिमंडळाचा हा पहिला विस्तार असणार
आहे. आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, ज्योतिरादित्य
शिंदे आणि सुशील मोदी यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील भाजपचे खासदार नारायण राणे आणि हिना गावीत व प्रीतम मुंडे, यांचीही नावं चर्चेत आहेत.
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात उत्तर प्रदेशवर विशेष
लक्ष दिलं जाण्याची शक्यता आहे. कारण उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी विधानसभा
निवडणूक होणार आहे. राजकीयदृष्ट्या उत्तर प्रदेश हे सर्वाधिक महत्त्वाचे राज्य
आहे. मंत्रिमंडळ विस्तारात पश्चिम बंगालचं प्रतिनिधित्व वाढू शकतं. भाजप सहकारी
पक्ष जेडीयू आणि अपना दल (एस) ला प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता असल्याचं
सांगण्यात येत आहे. पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात आरपीआयचे नेते रामदास आठवले
हे एकमेव गैर भाजप नेते आहेत.
लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान यांचे गेल्या
वर्षी निधन झाले. यामुळे त्यांचे बंधू पशुपती कुमार पारस यांना मंत्रिमडळात स्थान
मिळणार का, याकडेही लक्ष आहे. रामविलास
पासवान यांचे पुत्र चिराग पासवान आणि पारस यांच्यात मतभेद वाढले आहेत. यामुळे पक्ष
दोन गटात विभागला गेल्याचं चित्र आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात सध्या ५३ मंत्री
आहेत. नियमानुसार मंत्र्यांची जास्तीत जास्त संख्या ही ८१ आहे.
0 टिप्पण्या