Ticker

6/Breaking/ticker-posts

शिवरायांचा अवमान करणारा श्रीपाद छिंदम गोत्यात ; फॉरेन्सिक अहवालातून 'हा' पुरावा उघड..

 

*अहमदनगर पोलिसांनी दाखल केले दोषारोपपत्र

*ऑडिओ क्लिपमधील आवाज छिंदमचाच असल्याचा फॉरेन्सिकचा अहवाल



लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 अहमदनगर:  मराठी माणसांचे दैवत शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी माजी उपमहापौर श्रीपाद शंकर छिंदम (वय ३५) याच्या विरोधात सोमवारी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लीपमधील आवाज छिंदम याचाच असल्याचा फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आणि सहा साक्षीदारांचे जबाब यांचा दोषारोपत्रात समावेश आहे.

तपास अधिकारी तोफखाना पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक किरण सुरसे यांनी हे साठ पानांचे दोषारोपपत्र सोमवारी नगरच्या न्यायालयात दाखल केले. फेब्रुवारी २०१८ मध्ये हा गुन्हा घडला होता. गुन्हा घडला तेव्हा छिंदम उपमहापौरपदावर होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी गृहविभागाची परवानगी हवी असते. ती मिळविण्याची प्रदीर्घ प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली. त्यानंतर लगेचच हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

हा गुन्हा ऑडिओ क्लिपवर आधारित आहे. बांधकाम विभागाचे कर्मचारी अशोक बिडवे यांच्याशी दूरध्वनीवरून बोलताना छिंदम याने शिवरायांबद्दल अपशब्द उच्चारले होते. छिंदम उपमहापौर असल्याने त्यांनी बिडवे यांना फोन करून एक काम सांगितले. मात्र, त्यावेळी शिवजयंती जवळ आली होती. त्यामुळे महापालिकेची संबंधित यंत्रणा त्या तयारीत असून ते काम झाले की, तुमचे करतो, असे बिडवे फोनवर छिंदमला सांगत होते. त्या दरम्यान छिंदम याने एकदम संतापून शिवरायांबद्दल गलिच्छ भाषा वापरली. बिडवे यांनाही शिवीगाळ केली. ही ऑडिओ क्लिप नंतर व्हायरल झाली.

याप्रकरणी शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी फिर्याद दिली होती. त्यावरून हा गुन्हा दाखल झालेला आहे. या क्लिपचा वापर मुख्य पुरावा म्हणून होणार आहे. पोलिसांनी तपासात ही क्लिप आणि छिंदम याच्या आवाजाचे नमुने घेऊन फॉरेन्सिक लॅबला पाठविले होते. त्याचा अहवालही मिळाला असून तो पुरावा पोलिसांनी दोषारोपपत्रासोबत जोडला आहे. याशिवाय अन्य सहा साक्षीदारांचे जबाबही नोंदविण्यात आले आहेत. नगरच्या न्यायालयात या प्रकरणावरील सुनावणी केव्हा सुरू होणार, हे लवकरच स्पष्ट होईल. छिंदम सध्या जामिनावर मुक्त आहे. काही दिवसांपूर्वीच त्याच्याविरुद्ध दिल्लीगेट येथील गाळ्यांच्या प्रकरणातून जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हाही दाखल झालेला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या