Ticker

6/Breaking/ticker-posts

राहुल गांधी यांनी पटोलेंना दिले बळ ! आघाडीतील अंतर्गत 'सामना' आणखीच रंगणार..

 *स्वबळावर लढण्याबाबत पुन्हा केले मोठे विधान.

*राज्यात काँग्रेस भक्कम करण्याचा प्लान ठरला.








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधीं यांनी महाराष्ट्रात काँग्रेसला स्वबळावर लढण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना मोठं बळ मिळालं आहे. दिल्लीत राहुल यांची भेट घेऊन मुंबईत परतलेल्या नाना पटोले यांनी आज माध्यमांशी संवाद साधत भेटीच्या अनुषंगाने अधिकचा तपशील दिला. नाना पटोले यांचा आक्रमक बाणा पाहता व त्यांची आजची विधाने पाहता येत्या काळात महाविकास आघाडीतील अंतर्गत 'सामना' आणखीच रंगतदार होणार हे स्पष्ट झाले आहे.

 महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला गतवैभव प्रात करून देण्यासाठी आणि संघटन भक्कम करण्यासाठी राहुल गांधी यांनी एक 'मास्टर प्लान' तयार केला आहे, अशी महत्त्वाची माहिती आज पटोले यांनी माध्यमांशी बोलताना दिली. काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी सरकारमध्ये असला तरी येत्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे आणि त्याला राहुल गांधी यांनीही होकार दिला आहे, असे पटोले यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. महाराष्ट्रात काँग्रेस पक्षासाठी मी एक स्वप्न पाहिलं आहे. काँग्रेस राज्यात एक नंबरचा पक्ष बनवायचा आहे. यासाठीच राहुल गांधी यांनी मास्टर प्लान दिला असून त्यावर आम्ही सगळे मिळून काम करणार आहोत. काँग्रेस पक्ष भक्कम करण्यासाठी आम्ही काहीही करायला तयार आहोत, असे पटोले यांनी सांगितले. संघटनात्मक पातळीवर फेरबदल केले जाण्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीतील मित्रपक्षांसोबत लढणार असे विचारले असता नाना पटोले यांनी सावध प्रतिक्रिया दिली. विधानसभा आणि लोकसभा निवडणुका तीन वर्षांनंतर होणार आहेत. त्यामुळे आताच यावर काही सांगता येणार नाही आणि याबाबत जो काही निर्णय असेल तो आमच्या हायकमांडकडून घेतला जाणार आहे, असे पटोले यांनी सांगितले.

दरम्यान, नाना पटोले यांच्या काही विधानांमुळे महाविकास आघाडीत तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे. माझ्यावर मुख्यमंत्री 
उद्धव ठाकरे
 आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सांगण्यावरून पाळत ठेवली जात आहे. आमचे सहकारीच आमच्या पाठीत सुरा खुपसत आहेत, असे गंभीर आरोप पटोले यांनी केले होते. त्यानंतर माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला असे म्हणत त्यांनी सारवासारव केली होती. या सगळ्या घडामोडींनंतर पटोले यांना दिल्लीतून स्वबळासाठी हिरवा कंदील मिळाल्याने येत्या काळात राजकारण अधिकच तापणार हे निश्चित आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या