Ticker

6/Breaking/ticker-posts

महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात लसीकरण थंडावले , करोनाचे सावट कायम

 






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

 औरंगाबादः करोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची चर्चा असताना मराठवाड्यात करोनाबाधितांची संख्या अद्याप नियंत्रणात नाही. बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात दररोज सर्वाधिक रुग्ण आढळतात. गेल्या २४ तासात विभागात ३२९ नवीन रुग्णांची भर पडली आहे.

मराठवाड्यात करोनाचे सावट पूर्णपणे दूर झालेले नाही. दुसऱ्या लाटेत बहुतांश जिल्ह्यांनी नियमांची अंमलबजावणी करीत करोना नियंत्रणात आणला. मात्र, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात दररोज सर्वाधिक रूग्ण आढळत आहेत. मागील २४ तासांत बीड जिल्ह्यात सर्वाधिक २०६ नवीन रुग्णांची भर पडली आहे. औरंगाबाद (२८), जालना (९), परभणी (१), हिंगोली (२), नांदेड (५), लातूर (२१) आणि उस्मानाबाद (५५) अशी जिल्हानिहाय रुग्णांची नोंद झाली आहे. विभागात सोमवारी सकाळी नऊपर्यंत ३२९ नवीन रुग्ण आढळले असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या दोन हजार ७३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ९७.०५ टक्के आहे. तर मृत्यूदर २.५१ टक्के आहे.

 मनपा हद्दीत कमी रुग्ण आहेत, तर ग्रामीण भागात रुग्णवाढीचा वेग अधिक आहे. त्यामुळे काही भागात प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहेत. करोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी स्थानिक प्रशासनाला चाचण्या घेण्याचे आदेश आहेत. चाचण्या घेण्यात येत असल्या, तरी त्याचे प्रमाण घटले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ८७१ आरटीपीसीआर चाचण्या घेतल्यानंतर २५ रुग्ण पॉझिटीव्ह आढळले. जालना जिल्ह्यात सर्वाधिक २६८१ आरटीपीसीआर चाचण्या घेण्यात आल्या. त्यात नऊ रुग्ण आढळले आहेत. अँटीजेन चाचण्यांचे प्रमाण जास्त असून त्यात पॉझिटीव्ह रुग्ण आढळण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. सध्या बीड जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर सर्वाधिक ४.६१ टक्के आहे. तर उस्मानाबाद जिल्ह्याचा ४.४४ टक्के आहे. इतर जिल्ह्यात पॉझिटीव्हीचे प्रमाण दोन टक्क्यांपेक्षा कमी आहे.

 दरम्यान, काही दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमांची संख्या वाढली आहे. करोना निर्बंधाची नियमावली असली तरी नागरिक आणि संयोजक त्याचे पालन करीत नाहीत. गर्दीत सुरक्षित अंतराच्या नियमाचे सर्रास उल्लंघन होते. काही गावात प्रशासनाची मान्यता नसतानाही आठवडी बाजार सुरू झाले आहेत. या परिस्थितीत करोना परिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे.


लसीकरण थंडावले

करोना संसर्ग कमी करण्यात प्रशासनाला यश आले नाही. नागरिकांना करोना लशीचा दुसरा डोस मिळवण्यासाठी लसीकरण केंद्राबाहेर हेलपाटे मारावे लागत आहेत. ग्रामीण भागातील केंद्रावर लशीचे पुरेसे डोस उपलब्ध नसतात. शहरात ऑनलाइन नोंदणी करुनही नागरिकांना लस मिळत नाही. या गलथान कारभारामुळे नागरिक लस घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. कोव्हिड लसीकरण वेगाने झाल्यास संसर्ग आटोक्यात आणणे शक्य आहे. अन्यथा, रुग्णसंख्या वाढण्याची भीती आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या