*नगर दक्षिण लोकसभा निवडणूक
लढण्याचे दिले संकेत
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
पारनेर: ‘आधी पारनेर
तालुक्यातील काही नेते मला विरोधक
मानून टीका करीत होते. आता माझ्या कामामुळे जिल्ह्यातील काही जणांना मी विरोधक
वाटू लागल्याने तेही टीका करू लागले आहेत. त्यांच्या टीकेकडे मी फारसे लक्ष देत
नाही. मात्र, वेळ आल्यास लोकसभेची निवडणूकही आपण सक्षमपणे लढण्यास तयार आहोत,’ अशा शब्दांत पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश
लंके यांनी नगरचे भाजप खासदार डॉ.
सुजय विखे यांना आव्हान दिले आहे.
पारनेर
तालुक्यातील पळशी येथील एका कार्यक्रमात बोलताना लंके यांनी हे आव्हान दिले.
अलीकडेच खासदार डॉ. विखे पाटील यांनी लंके यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली
होती. लंके यांच्या पुढाकारातून सुरू असलेल्या कोविड सेंटरच्या अनुषंगाने विखे
पाटील यांनी ही टीका केली होती. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडून लंके यांना
मिळत असलेले पाठबळ आणि विरोधकांकडून होत असलेली टीका लक्षात घेऊन लंके हे
राष्ट्रवादीचे नगर लोकसभा मतदारसंघातील पुढील उमेदवार असू शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे. आता लंके यांनी स्वत:च याला दुजोरा देत आपली
तयारी असल्याचेही म्हटले आहे.
लंके म्हणाले, ‘माझ्याकडे कोणत्याही संस्था नाहीत.
कारखाने नाहीत, हॉस्पिटल नाहीत. माझ्याकडे आहे ती जीवाभावाची
माणसे. तशी माणसे मात्र कोणाकडे नाहीत. त्यामुळे कोणी कितीही टीका केली तरीही मी
घाबरत नाही. आधी तालुक्यातील काही जण मला स्पर्धक मानून टीका करीत होते. आता
जिल्ह्यातील लोकही स्पर्धक मानू लागले आहेत. त्यामुळे मी डगमगणार नाही. मात्र,
वेळ पडली तर लोकसभा निवडणूकही सक्षमपणे लढविण्यास आपण तयार आहोत.
फक्त बोलणारे खूप असतात. संतांनाही त्रास झाला होता, मी तर
साधा माणूस आहे. मात्र आपण जीवाला घाबरत नाही. त्यामुळेच कोविड सेंटरच्या
माध्यमातून लोकांची सेवा करू शकलो. आज जे माझ्यावर आणि कोविड सेंटरवर टीका करीत
आहेत, त्यांच्या संस्थेतील कर्मचाऱ्यांनाही आमच्या कोविड
सेंटरमध्ये उपचार घेण्याची वेळ आली. विळद घाटातील त्यांच्या संस्थेत नोकरीला
असलेल्या सुरक्षा अधिकाऱ्याला करोनाची लागण झाली. तेव्हा तेथील हॉस्पिटलमध्ये
त्यांना दाखल करून घेताना अनामत रक्कम मागितली गेली. त्यामुळे ते आमच्या सेंटरला
आले आणि मोफत उपचार घेऊन गेले, असे लंके यांनी सांगितले.
आमच्या कोविड सेंटरवर टीका करणाऱ्यांनी
येथील काम पहावे. आतापर्यंत या कोविड सेंटरमधून सुमारे १७ हजार रुग्ण उपचार घेऊन
बरे झाले आहेत. खासगी हॉस्पिटलच्या दरांच्या तुलनेत हिशोब काढायचा झाला तर सुमारे
१८५ कोटी रुपयांचे हे काम झाले आहे. लोकांचा एवढा पैसा वाचला आहे. काहींनी
दिल्लीहून विमानाने रेमडेसिवीर इंजेक्शन आणल्याचे सांगितले, मात्र त्यांनी ती कोठे वाटली. त्या काळात रेमडेसिवीरचा काळाबाजार कसा झाला, त्याचे
केंद्र कोणते होते, लाभार्थी कोण होते, याची जर चौकशी केली तर अनेक जण अडचणीत येतील. या मतदारसंघातील के. के.
रेंजचा प्रश्न खऱ्या अर्थाने आपणच सोडविला आहे. आपण जिवंत असेपर्यंत या
प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमीनी जाऊ देणार नाही. रणगाड्याखाली झोपणारा मी पहिला
असेन, असेही लंके म्हणाले.
1 टिप्पण्या
तुम्हाला लोकसभा लढायला नाही जमनार साहेब तुम्हि आहेत तेथेच चांगल काम करू शकाल अन्यथा तुमचा पन हे लोक शिंदे बनवतील
उत्तर द्याहटवा