मोहिते-पाटील समर्थक सदस्यांनी थेट राष्ट्रवादीच्या घटनेचीच केली मागणी
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
सोलापूर
: पक्षाने व्हिप बजावल्यानंतरही विरोधकांना मतदान
करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ६ सदस्यांनी आता थेट राष्ट्रवादी पक्षालाच आव्हान
दिलं आहे. हे सर्व सदस्य मोहिते-पाटील गटाचे समर्थक असून त्यांचे सदस्यत्व रद्द
करण्याची मागणी राष्ट्रवादीने यापूर्वीच केली आहे. त्या मागणीला शह देण्यासाठीच
मोहिते-पाटील समर्थक सदस्यांनी थेट राष्ट्रवादीच्या घटनेचीच मागणी केली आहे.
त्यामुळं पवार विरुद्ध मोहिते-पाटील हा वाद पुन्हा एकदा उफाळून येणार आहे.
सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष व
उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने व्हिप बजावूनही माळशिरस
तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शीतल देवी मोहिते-पाटील, स्वरुपाराणी मोहिते पाटील, अरुण तोडकर, गणेश पाटील, मंगल
वाघमोडे, सुनंदा फुले या सहा सदस्यांनी विरोधात मतदान
केल्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव
झाला.
या सदस्यांनी पक्षाचा व्हिप डावल्याबद्दल
त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी सुरू आहे. मंगळवारी
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासमोर दुपारी साडेबारा वाजता सुनावणी होती.
यावेळी तक्रारदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे व
त्यांच्यावतीने अॅड.उमेश मराठे, अॅड इंद्रजीत पाटील, अॅड.बाबासाहेब जाधव हे हजर
होते.
सुनावणीसाठी
शितलादेवी मोहिते-पाटील वगळता स्वरुपाराणी मोहिते पाटील, मंगल वाघमोडे,सुनंदा फुले,अरुण तोडकर,गणेश पाटील या पाच सदस्यांनी आपले वकील अॅड.दत्तात्रय
घोडके, अॅड.अभिजीत कुलकर्णी, अॅड.नितीन
खराडे यांनी हजेरी लावली. तब्बल एक तास सुनावणी चालली. सुनावणीनंतर १४ जुलै रोजी
पुढील तारीख देण्यात आली आहे.
दरम्यान, अर्जदार साठे यांचे वकील ऍड.मराठे यांनी म्हटलं की,
'मोहिते पाटील गटाने दोन अर्ज दिले आहेत. तसेच तक्रारदार
यांच्यावतीने १ अर्ज दाखल करण्यात आला. त्यामध्ये त्यांनी एका अर्जात राष्ट्रवादी
पक्षाच्या घटनेची मागणी केली आणि पहिल्या अर्जात हायकोर्टाच्या आदेशानुसार
प्राथमिक मुद्दा काढावा, याचिका दाखल करताना जे कागदपत्रे
सादर केले नाहीत, पुरावे नाहीत त्यावर पूर्ण चौकशी न करता
प्राथमिक मुद्द्यावरच पिटीशन डिसमिस करावा अशा मागणीचा दुसरा अर्ज मोहिते पाटील
गटाने दिला असल्याचे ऍड मराठे यांनी सांगितले.'
या प्रकरणात तोंडी पुरावा अगोदर सहा
सदस्यांचा देण्यात यावा आणि नंतर तक्रारदार यांना संधी देण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. याबाबत
आता येत्या १४ जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
0 टिप्पण्या