लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
मुंबई: राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये
करोना संसर्गाची स्थिती नियंत्रणात आहे आणि रुग्णवाढीचा दर नगण्य आहे अशा
जिल्ह्यांत सध्या लागू असलेले निर्बंध मोठ्या प्रमाणात शिथील केले
जाणार आहेत. याअनुषंगाने अभ्यास अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांनी आरोग्य विभागाला दिल्या
असून पुढील दोन ते तीन दिवसांत निर्बंध शिथील करण्याबाबत मोठा निर्णय मुख्यमंत्री
घेतील, असे
स्पष्ट संकेत आरोग्यमंत्री राजेश
टोपे यांनी दिले आहेत.
राज्यातील कोविड स्थितीबाबत आज राज्य
मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे
यांनी निर्बंधांबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती माध्यमांना दिली आहे. राज्यातील ३६
जिल्ह्यांपैकी ११ जिल्ह्यांमध्ये कोविड रुग्णवाढीचा दर राज्याच्या सरासरीपेक्षा
जास्त आहे. त्याचवेळी इतर २५ जिल्ह्यांत रुग्णवाढीचा दर आणि अॅक्टिव्ह रुग्णांची
संख्या वेगाने खाली येत आहे. काही जिल्ह्यांचा करोना पॉझिटिव्हिटी दर तर नगण्य
आहे. त्यामुळेच या जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथील करण्याची आवश्यकता असून तसा
प्रस्ताव मुख्यमंत्र्यांसमोर ठेवण्यात आला आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी
अभ्यासपू्र्ण अहवाल देण्यास सांगितले असून त्याची पूर्तता आम्ही उद्यापर्यंत करू.
त्यानंतर पुढील दोन तीन दिवसांत त्यावर निर्णय होऊ शकतो, असे
टोपे यांनी स्पष्ट केले.
निर्बंध शिथील करत असताना नेमकी कोणत्या बाबतीत आणि
किती प्रमाणात शिथीलता द्यावी, आठवडाभराचे नियोजन कसे असावे, या सर्वाचाच विचार
केला जात आहे. सध्या सरासरी सगळीकडेच सायंकाळी ४ वाजता दुकाने बंद करण्याचे
निर्देश आहेत. त्यात बऱ्यापैकी शिथीलता देण्यात येईल. रेस्टॉरंट्सबाबतही तसाच
निर्णय होईल. मुम्बई लोकल रेल्वे सेवेचा विचार केल्यास ज्यांनी कोविड वरील
लसचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा दिली जावी, असा आमचा विचार असल्याचे टोपे यांनी अगदी
स्पष्ट शब्दांत सांगितले. कोविडची तिसरी लाट येईल तेव्हा येईल. आम्ही या लाटेला
तोंड देण्यासाठी सज्ज आहोत, असा विश्वास व्यक्त करताना कोविड
काळात अर्थचक्र थांबू नये म्हणून कायमचे निर्बंध ठेवणे योग्य ठरणार नाही, हे आमचेही मत असल्याचे टोपे यांनी नमूद केले. काही देशांत कोविडची तिसरी
लाट आली आहे. मात्र मोठ्या प्रमाणात लसीकरण झालेले असल्याने त्याची दाहकता कमी
दिसून येत आहे. प्रामुख्याने मृत्यूचे प्रमाण कमी दिसत आहे, असे
टोपे यांनी सांगितले.
0 टिप्पण्या