लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
मुंबईः महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांना
महाप्रलयाचा जबरदस्त फटका बसला आहे. प्रशासनाने आतापर्यंत राज्यातील किमान दीड लाख
लोकांना पुराच्या वेढ्यातून सुखरूप बाहेर काढलं आहे. लोकांनी आपली घरे, व्यवसाय,
संसार गमावला आहे. त्यांना सहस्त्र हातांनी मदत व्हायला हवी. राज्य
सरकार मदत करतच आहे. पण मुंबईतील श्रीमंतांनी, ज्यांची
ज्यांची पत आणि ऐपत आहे त्यांनी तसंच खास करुन आपल्या प्रिय दिल्लीश्वरांनी आपल्या
दिलदारीचे प्रदर्शन करावे, अशी विनंती शिवसेनेनं केली आहे.
राज्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीने
सगळ्यांनाच हादरवून सोडलं आहे. दरडी कोसळून झालेल्या अपघातांमध्ये अनेकांनी आपला
जीव गमावला आहे. यावर शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून भाष्य केलं आहे. ' महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांना
महाप्रलयाचा जबरदस्त फटका बसला आहे. कोल्हापूर, सातारा,
सांगली, नाशिक, जळगाव,
नांदेड, यवतमाळ, वर्धा,
नगर, अमरावती, भंडारा,
रत्नागिरी, रायगड आणि मुंबईतील काही भागांवर
पावसानं कोप केला आहे. या सर्व संकटातून बाहेर पडण्यासाठी राज्याचा हजारो हातांचे
बळ लागेल,' असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
' मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तळीये, चिपळूण वगैरे भागात पोहोचले. लोकांना धीर धरा, असे सांगितले. पुनर्वसनाचा विषय मार्गी लागेल, असं अश्वस्त केले. पाठोपाठ विरोधी पक्षही सवतसुभ्याप्रमाणे पोहोचला. लोकांचे दुःख समजून घेतले पाहिजे हे ठीक, पण शेवटी यंत्रणेवर ताण पडेल व पूरग्रस्तांवर मानसिक दबाव येईल असे वागण्याची ही वेळ नाही,' असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.
' मुख्यमंत्री पहिल्या मिनिटापासून
मंत्रालयातील नियंत्रण कक्षात बसून पूरपरिस्थितीचा आढावा घेत होते. कोठे काय मदत
हवी ती पोहोचवण्यासंदर्भात सर्वच विभागांशी बोलत होते. संबंधित मंत्री, पालकमंत्री, अधिकारी यांना सूचना देताना दिसत होते.
तरीही 'मुख्यमंत्री लगेच का पोहोचले नाहीत?' असा पोरकट प्रश्न विचारणारे काही लोक स्वतःचेच हसे करून घेत आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता आपत्तीग्रस्त भागात पोहोचलेच आहेत, पण आधी मदत पोहोचणे गरजेचे होते. दुर्घटनास्थळी पोहोचून फोटोचे कार्यक्रम
उरकणे याला संवेदना किंवा पुनर्वसन म्हणता येत नाही,' असा
खोचक टोला शिवसेनेनं विरोधीपक्षाला लगावला आहे.
' केंद्र सरकारने मदतीचा हात पुढे
केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा तसेच
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांशी मदत आणि सहकार्याबाबत
फोन करून चर्चा केली आहे. एनडीआरएफ, लष्कर, हवाई दल यांच्या तुकडय़ा मदत करीत आहेतच. शिवाय भविष्यात पूरपरिस्थितीचे
संकट उद्भवू नये यासाठी ज्या दूरगामी उपाययोजना कराव्या लागणार आहेत त्यासाठीही
केंद्राची मदत लागणार आहे, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी
व्यक्त केली आहे,' असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.
0 टिप्पण्या