Ticker

6/Breaking/ticker-posts

जेसीबीने गुलाल उधळणं पडलं महागात; 'त्या' १६ जणांविरुद्ध गुन्हा

 

*उपसभापतीपद मिळाल्याने साजरा केला होता आनंदोत्सव.








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 कोल्हापूर: उपसभापतीपद मिळाल्यानंतर आनंदोत्सव साजरा करण्यासाठी जेसीबीने उधळलेला गुलाल कोल्हापूर जिल्ह्यातील कागल पंचायत समितीच्या उपसभापतींसह सोळा जणांना महागात पडला. करोना संसर्ग वाढत असताना गर्दी करून नियम मोडल्याबद्दल या सर्वांच्या विरोधात कागल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कागल पंचायत समितीचे उपसभापतीपद  बाणगे येथील मनीषा संग्राम सावंत यांना मिळाले. त्यानंतर आनंद साजरा करण्यासाठी त्यांनी गावात जेसीबीने गुलाल उधळला होता. या प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेत गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार कागल पोलीस ठाण्यात उपसभापती मनीषा सावंत , त्यांचे पती संग्राम सावंत, गावचे उपसरपंच लंबे, जेसीबीचे मालक नेताजी पाटील यांच्यासह सोळा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे जेसीबीने गुलाल उधळणं या सर्वांना चांगलंच भोवलं आहे.

नेमकं काय घडलं ?

कागल तालुका पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीची निवड नुकतीच पार पडली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश तोडकर यांची सभापती म्हणून तर शिवसेनेच्या मनिषा संग्राम सावंत यांची उपसभापती म्हणून बिनविरोध निवड झाली. तोडकर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ गटाचे तर सावंत माजी आमदार संजय घाटगे गटाचे. चार वर्षांपासून या पंचायत समितीत मुश्रीफ व घाटगे गटाची आघाडी आहे. म्हणजे राज्यात महाविकास आघाडी अस्तित्वात येण्यापूर्वीच कागल तालुक्यात ती स्थापन करण्यात आली होती. 

कागलची ओळख महाराष्ट्राचे राजकीय विद्यापीठ अशी आहे. या तालुक्यात मंडलिक, मुश्रीफ, राजे व घाटगे असे चार गट आहेत. येथे पक्षाला फारसे महत्त्व नसते. प्रत्येकावर गटाचा शिक्का आहे. पंचायत समितीत एकत्र असलेले मुश्रीफ व घाटगे गट नुकत्याच झालेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत एकमेकांसमारे उभे ठाकले होते. विशेष म्हणजे या निवडणुकीत मुश्रीफांचे सुपूत्र नाविद व घाटगेंचे सुपूत्र अंबरिष हे दोन वेगवेगळ्या आघाडीतून निवडून आले. ही सर्व पार्श्वभूमी असताना पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांची निवड झाली. त्यामध्ये बानगे येथील सावंत यांच्या गळ्यात उपसभापतीपदाची माळ पडली. घरात प्रथमच पद आल्याने सावंत कुटुंबीयांना इतका आनंद झाला की, त्यांनी थेट जेसीबीने गुलाला उधळला. त्यासाठी अनेक पोती गुलाल आणण्यात आला.

 आनंदाच्या भरात करोना संसर्गाच्या सुरक्षिततेच्या नियमांचाही विसर पडला. एकीकडे फटाक्याची आतषबाजी आणि दुसरीकडे जेसीबीने कित्येक पोती गुलाल आणि पिवडी ओतली जात होती. सारा गाव एक होवून आनंदोत्सवात दंग झाला. संपूर्ण गावात ही विजयी मिरवणूक काढण्यात आली. त्यामुळे सारा गावच गुलाल आणि पिवडीने न्हावून गेला. त्यांच्या या विजयोत्सवी मिरवणुकीची चर्चा साऱ्या जिल्ह्यात सुरू असताना आता संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याने आनंदोत्सवाचे रंग फिके झाले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या