*टीम इंडियाचा
श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात तीन विकेटने रोमांचक विजय
* विजयाचा हिरो
ठरला दीपक चहर. दीपक चहरनं नाबाद 69 धावांची खेळी केली.
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
IND Vs SL: टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात तीन विकेटने
रोमांचक विजय मिळवला. हातातून गेलेला सामना राहुल चहरनं फिरवला आणि दुसरा सामना
जिंकत टीम इंडियाने मालिकाही खिशात घातली. भारताच्या या विजयाचा हिरो ठरला दीपक
चहर. दीपक चहरनं नाबाद 69 धावांची खेळी करत संघाला हातातून निसटलेला सामना जिंकून दिला. या
विजयानंतर दीपकनं विजयाचं श्रेय कोच राहुल द्रविडला दिलं आहे.
दीपक चहरनं म्हटलं की, राहुल द्रविडच्या विश्वासामुळं टीम इंडियाला विजय मिळवून देऊ शकलो. देशासाठी मॅच जिंकण्यापेक्षा मोठी गोष्ट कुठलीच नाही. राहुल सरांनी मला प्रत्येक चेंडू खेळून काढण्याचा सल्ला दिला होता.
दीपक चहर म्हणाला की, राहुल द्रविड यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. मी इंडिया ए साठी खेळत होतो तेव्हाही ते कोच होते. मी तिथंही चांगली फलंदाजी केली होती. त्यांनी मला म्हटलं होतं की, मी सातव्या क्रमांकावर चांगली फलंदाजी करु शकतो. टार्गेट जेव्हा 50 च्या अंतरात आलं त्यावेळी मला वाटलं आपण जिंकू शकतो, मग मी थोडी रिस्क घेतली, असं तो म्हणाला.
श्रीलंकेने दिलेल्या 275 धावांचा पाठलाग करताना एक वेळ अशी होती की भारताची जिंकण्याची आशा मावळली होती. 197 वर 7 गडी बाद असल्यामुळे श्रीलंकेचं पारडं जड होतं. मात्र दीपक चहर आणि भुवनेश्वर कुमारची खेळी निर्णायक ठरली. दोघांनी 84 धावांची अभेद्य भागिदारी करत संघाला सामना आणि मालिका जिंकून दिली. श्रीलंकेने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. मागील सामन्यात मॅन ऑफ द मॅच ठरलेला पृथ्वी शॉ अवघ्या 13 धावा करुन बाद झाला. त्यानंतर आलेला ईशान किशनही एक धाव करुन बाद झाला.
त्यानंतर कर्णधार शिखर धवनही 29 धावा करुन बाद झाला. शिखर धवननंतर सूर्यकुमार यादव आणि मनिष पांडेने टीम इंडियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र मनिष पांडे 37 धावांवर रनआऊट झाला. मनिषनंतर आलेला हार्दिक पांड्याही खातं न उघडताच तंबूत परतला. त्यानंतर अर्धशतक साजरं करुन सूर्यकुमार यादवही बाद झाला. त्याने 53 धावा केल्या. कृणाल पांड्यावर भारताच्या खेळाची धुरा उरलेली असताना तोही 35 धावांवर बाद झाला. त्यामुळे भारताने हा सामना गमावला अशी स्थिती असताना दीपक चहर आणि भुवनेश्वर कुमारने जबाबदारीने खेळी करत टीम इंडियाला विजयापर्यंत नेले. दोघांनी आठव्या विकेटसाठी नाबाद 84 धावांची नाबाद खेळी केली. यात दीपक चहरने 69 धावांची आणि भुवनेश्वर कुमारने 19 नाबाद धावांची खेळी केली.
0 टिप्पण्या