लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
बीजिंग: अफगाणिस्तानची सत्ता ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात तालिबान आहे.
अनेक ठिकाणी अफगाण सैन्यांसोबत त्यांच्या चकमकी होत आहेत. तर, दुसरीकडे तालिबानी नेत्यांचे एक शिष्टमंडळ
चीन दौऱ्यावर आहे. तालिबानने चीनकडे मैत्रीचा हात पुढे केला आहे. तर, चीनने तालिबानसमोर अटी ठेवल्या आहेत. चीनने या अटी पाकिस्तानच्याही
बाजूने ठेवल्याचे वृत्त आहे. त्यानुसार, चीन व
पाकिस्तानच्या विरोधात असणाऱ्या दहशतवादी गटांशी संबंध तोडणे आणि त्यांना
अफगाणिस्तानमधून हुसकावून लावण्याची अट चीनने ठेवली आहे.
पाकिस्तानी वृत्तपत्र 'एक्स्प्रेस ट्रिब्युन'ने दिलेल्या वृत्तानुसार, चीनने या अटी
ठेवल्या आहेत. अफगाणिस्तानच्या ९० टक्के भूभागावर ताबा मिळवला असल्याचा दावा
तालिबानने केला आहे. तालिबान आता चीनच्या शिंजियांग प्रांताच्या सीमेवर दाखल झाले
आहेत. या ठिकाणी 'ईस्ट तुर्कमेनिस्तान इस्लामिक
मुव्हमेंट' या दहशतवादी गटाचे सक्रीय सदस्य आहेत. तर,
पाकिस्तानमध्ये तहरीक-ए-तालिबान ही दहशतवादी संघटना सक्रीय असून
दहशतवादी हल्ले केले जातात. या दोन्ही संघटनांना अफगाणिस्तानमध्ये आश्रय न
देण्याची अट तालिबानला घालण्यात आली आहे.
चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी तालिबानचे
नेते मुल्ला अब्दुल गनी बरादर यांच्यासोबत बुधवारी चर्चा केली. यावेळी वांग यी
यांनी तालिबान ही अफगाणिस्तानमधील महत्त्वाची लष्करी आणि राजकीय शक्ती असल्याचे
म्हटले. तालिबानने सर्व दहशतवादी गटांशी संपर्क तोडण्याचे आवाहन केले. विशेषत:
उइगर मु्स्लिम कट्टरतावादी गट 'ईस्ट तुर्कमेनिस्तान इस्लामिक मुव्हमेंट'ला
(ईटीआयएम) थारा न देण्यास सांगितले.
0 टिप्पण्या