लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
अहमदनगर:
‘नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या दोन
दिवसांच्या अधिवेशात तालिका अध्यक्ष म्हणून शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी चांगले काम केले.
त्यांचे कौतूकच आहे. पण म्हणून हे पद शिवसेनेला देण्यासंबंधी कोणतीही चर्चा अगर
विचार नाही. आमच्याकडेही अनेक ‘भास्कर जाधव’ आहेत, हे पद काँग्रेसकडेच राहणार आहे,‘ अशी भूमिका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी
मांडली.
थोरात शनिवारी नगरला आले होते. त्यावेळी
आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी यासंबंधीची काँग्रेसची भूमिका मांडली. विधानसभेत
तालिका अध्यक्ष म्हणून कामाचे कौतूक झाल्यानंतर जाधव यांना अध्यक्षपदाचे वेध
लागल्याचे पहायला मिळते. शिवसेनेने हे पद आपल्याकडे घ्यावे, असेही जाधव यांनी म्हटले आहे. तर
वनमंत्री संजय राठोड यांचे रिक्त झालेले पद काँग्रेसला द्यावे आणि त्या बदलत्यात
विधानसभेचे अध्यक्षपद शिवसेनेने घ्यावे, अशीही पक्षातून
मागणी होत आहे. यासंबंधी विचारले असता थोरातांनी काँग्रेसची भूमिका मांडली.
ते म्हणाले, ‘जाधव यांनी या अधिवेशनात चांगलेच काम केले. म्हणून
त्यांनाच हे पद द्यावे, असे काही नाही. आमच्या पक्षातही असे
सक्षमपणे काम करू शकणारे नेते आहेत. शिवाय जागा वाटपात हे पद काँग्रेसकडे आलेले
आहे. त्यामध्ये बदल करण्यासंबंधी कोणतीही चर्चा अगर विचार झालेला नाही.
अध्यक्षपदाची निवडणूक या अधिवेशात होऊ शकली नाही. त्यासाठी बरीच मोठी प्रक्रिया
असल्याने आणि कोणाचाही हक्क डावलला जाऊ नये, यासाठी वातावरण
निवळल्यावरच ही निवडणूक घ्यावी लागणार आहे.
थोरात पुढे म्हणाले, 'काल दिल्लीत मी आणि मंत्री नितीन राऊत
आपापल्या कामासाठी वेगवेगळे गेलेलो होता. अध्यक्षपद निवड किंवा अदलाबदलीचा
याच्याशी काही संबंध नव्हता. पूर्वी माझ्या एकट्यावरच कामाचा जास्त ताण आला होता.
पक्षातील आणि सरकारमधीलही महत्वाची पदे आणि जबाबदाऱ्या माझ्यावरच होत्या. त्यामुळे
पक्षाने तत्कालीन विधानसभा अध्यक्ष नाना पाटोले यांना त्या पदाचा राजीनामा देऊन
प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली. यामुळे या पदावरील पक्षाचा दावा गेलेला नाही,
संधीही गेली नाही किंवा पक्षाचे नुकसान झाले असेही म्हणता येणार
नाही. हे पद काँग्रेसकडेच असून जेव्हा निवडणूक होईल, त्यावेळी
त्या पदावर सक्षम नेता दिला जाईल. तसे उमेदवार आमच्या पक्षात आहेत.' असे थोरात म्हणाले.
0 टिप्पण्या