Ticker

6/Breaking/ticker-posts

एकनाथ खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट ; 'सह्याद्री'त नेमकं काय शिजलं?

 








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

मुंबई: एकनाथ खडसे यांनी आज मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे राष्ट्र्वादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हेही उपस्थित होते. खडसे यांची सक्तवसुली संचालनालयामार्फत चौकशी सुरू असून या पार्श्वभूमीवर झालेली ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

भोसरी एमआयडीसी येथील जमीन व्यवहार प्रकरणात एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. भाजप सोडून काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्या खडसे यांच्यामागे सध्या चौकशीचा ससेमिरा सुरू आहे. खडसे यांनी मंत्री असताना पदाचा गैरवापर केल्याचाही आरोप करण्यात आलेला आहे. भोसरी येथील जमीन व्यवहार प्रकरणी अलिकडेच एकनाथ खडसे यांची तब्बल ९ तास चौकशी करण्यात आली होती. या चौकशीनंतर ईडीला तपासात आपण संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे खडसे यांनी सांगितले होते. दरम्यान, या प्रकरणात खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली आहे. ते सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. आजच विशेष पीएमएलए कोर्टाने त्यांची कोठडी १९ जुलैपर्यंत वाढवली आहे. जमिनीच्या व्यवहाराशी चौधरी यांचा थेट संबंध असल्याने पुढील तपास आणि अधिक चौकशीसाठी आणखी कोठडी आवश्यक असल्याचे आज ईडीकडून कोर्टात सांगण्यात आले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी शरद पवार यांची घेतलेली भेट महत्त्वाची ठरली आहे.

शरद पवार हे सह्याद्री अतिथीगृह येथे एका शासकीय बैठकीसाठी आले होते. तिथेच एकनाथ खडसे यांनी त्यांची भेट घेतली. त्यावेळी अजित पवारही होते. या नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली असून त्याचा तपशील मात्र देण्यात आलेला नाही. ईडीकडून सध्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचीही चौकशी करण्यात येत आहे. त्यात आता खडसे हेसुद्धा ईडी चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. अशावेळी शरद पवार यांना नेमकं खडसे यांनी काय सांगितलं आणि पवार यांनी त्यांना कोणता सल्ला दिला, याबाबत अनेकप्रकारची चर्चा रंगली आहे. प्रामुख्याने राष्ट्रवादीचे नेते सध्या ईडी आणि सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर असून पक्षात त्यावर आधीपासूनच खल सुरू आहे. मुख्य म्हणजे खडसे यांनी पवारांची भेट घेतल्यानंतर पवार तिथून वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले. तिथे या विषयावर चर्चा झाली की नाही, याबाबतही कोणतीच माहिती अद्याप मिळालेली नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या