Ticker

6/Breaking/ticker-posts

केंद्रीय पथकाने अधिकार्याना फोडला घाम

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 औरंगाबाद : महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयामधील अधिकाऱ्यांना केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या प्रतिनिधींनी शनिवारी (१७ जुलै) अक्षरश: घाम फोडला. सकाळी आठ वाजल्यापासून हे प्रतिनिधी प्राणिसंग्रहालयात ठाण मांडून होते. त्यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली, अधिकारी वारंवार निरुत्तर होत होते. प्राण्यांची निगा, पर्यटकांसाठीच्या सोयी, पिंजऱ्यांचे आकार अशा अनेक बाबींबद्दल त्यांनी कानउघाडणीही केली. यापूर्वी लक्षात आणून दिलेल्या त्रुटी पूर्ण न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. अशीच स्थिती असेल तर प्राणिसंग्रहालयाला मुदतवाढ कशी द्यायची, असा सवाल त्यांनी केला.

सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयाचे मूल्यमापन करण्यासाठी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाचे दोन सदस्यीय पथक शुक्रवारी शहरात दाखल झाले. शुक्रवारी त्यांनी संपूर्ण प्राणिसंग्रहालय फिरून पाहणी केली, त्यानंतर त्यांनी शनिवारी संपूर्ण रेकॉर्ड तपासले. प्राणिसंग्रहालयात आतापर्यंत किती प्राणी जन्मले, किती प्राण्यांचा मृत्यू झाला, मृत प्राण्यांचे पोस्टमार्टम अवहाल आहेत का, पोस्टमार्टमचे अहवाल नेमके काय आहेत, प्राण्यांना कोणत्या प्रकारचे अन्न दिले जाते, त्याची स्वच्छता ठेवली जाते का, अन्न-पाणी दिल्याचे रोजचे रेकॉर्ड ठेवले जाते का आदींविषयी प्राधिकरणाच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारले, रेकॉर्ड सादर करण्यास सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गैरसोयींची यादी
* प्राण्यांसाठीचे पिंजरे लहान आकाराचे आहेत.
*पिंजऱ्यांमध्ये मचाण नाही, प्राण्यांना खेळण्यासाठी खेळणी ठेवलेली नाहीत.

* प्राणिसंग्रहालयासाठी कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे.
*प्रत्येक पिंजऱ्यासाठी एक केअर टेकर असला पाहिजे. मात्र, या ठिकाणी तसे नाही. मोजक्याच तीन-चार केअर टेकरना सर्व पिंजऱ्यांची जबाबदारी देण्यात आली आहे, हे योग्य नाही.
*प्राणिसंग्रहालय पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी कोणत्याच प्रकारच्या सुविधा नाहीत.

*पर्यटकांना पिण्याच्या पाण्याची सोय नाही, बसण्यासाठीचे ठिकाण नाही, मोकळेपणाने फिरण्यासाठी रस्ते नाहीत.
*उंचावरून प्राणी पाहण्यासाठी मचाण किंवा शिडीची व्यवस्था करण्यात आलेली नाही.

तीन वर्षांपूर्वीच्या त्रुटी कायम

पालिकेचे अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने यांनी दुपारी प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाचे प्रतिनिधी डॉ. गोवारी मालापूर व टी. अजयकुमार यांची भेट घेतली. तीन वर्षांपूर्वी प्राधिकरणाचे पथक आले होते, त्यांनी २८ प्रकारच्या त्रुटी काढल्या होत्या. त्यापैकी अनेक त्रुटींची पूर्तता करण्यात आली [i]नाही. ही बाब प्रतिनिधींनी नेमाने यांच्या लक्षात आणून दिली. नेमाने यांनी करोनाच्या प्रादुर्भावा कारण पुढे केले. करोनामुळे कामे ठप्प झाली आहेत, उत्पन्नही बुडाले आहे, पण येत्या काळात सर्व त्रुटी दूर करू, असे आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.


पाळीव प्राणी ठेवण्यास मनाई

प्राणिसंग्रहालय हे वन्यप्राण्यांसाठी असते, तेथे वन्यप्राणी प्राणिसंग्रहालयात ठेवले जातात. पाळीव प्राणी प्राणिसंग्रहालयात ठेवण्यास मनाई आहे. त्यामुळे ससे, घोडा, विविध प्रजातींचे कुत्रे, शेळी, मेंढी हे प्राणी प्राणिसंग्रहालयात ठेवता येत नाहीत, अशी माहिती प्राणिसंग्रहालयाचे सल्लागार डॉ. बी. एस. नाईकवाडे यांनी दिली. याच कारणामुळे प्राणिसंग्रहालयातील ससे इतरत्र हलविण्यात आले.



 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या