विहिंप काढणार भजन दिंडी, वारकऱ्यांना
पायी वारीला परवानगी देण्याची मागणी
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
अहमदनगर : 'पंढरीच्या वारीची परंपरा खंडित होऊ
नये, यासाठी नियम पाळून वारी करण्याची आमची तयारी आहे.
संसर्ग टाळण्यासाठी दिवसा शक्य नसेल तर वारकरी रात्री प्रवास करतील. लसीचे दोन्ही
डोस घेतलेल्या प्रत्येक दिंडीतील दोन वारकऱ्यांना पायी जाण्यास परवानगी द्यावी,'
अशी मागणी विश्व हिंदू परिषदेतर्फे करण्यात आली आहे. ती सरकारपर्यंत
पोहोचविण्यासाठी शनिवारी (१७ जुलै) जिल्हाधिकारी कार्यालयावर भजन दिंडी काढण्यात
येणार आहे, अशी माहिती विहिंपचे प्रांत सहमंत्री विवेक
कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी कुलकर्णी यांनी सांगितले, 'शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या
पंढरपूरच्या वारीमध्ये मुस्लिम व ब्रिटिश राजवटीमध्येही खंड पडला नव्हता. परंतु
सध्याच्या राज्य सरकारने हिंदूविरोधी भूमिका घेतल्याने प्रथमच वारीमध्ये खंड पाडला
आहे. वारकऱ्यांच्या मागण्यांचा सरकार विचार करत नाही. चर्चेला बोलावून दिशाभूल
केली जात आहे. वारीला निघालेले बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
हिंदूंच्या निरपराध संतांना अटक करून त्यांना अपराध्याची वागणूक देणाऱ्या
मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांची तत्काळ माफी मागितली पाहिजे. बाळासाहेब ठाकरे यांनी
हिंदुत्वाचा पुरस्कार केला. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हिंदुत्वविरोधी भूमिका
घेत आहेत. सरकारला हॉटेल, मॉल, दुकानातील
गर्दी चालते. पंढरपूरच्या निवडणुकीतील गर्दी चालते, दारूची
दुकाने चालतात, मात्र पंढरपूरची वारी चालत नाही. याचा निषेध
करण्यासाठी विश्व हिंदू परिषद व बजरंग दल १७ जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयावर भजन
दिंडी नेणार आहेत.' असेही त्यांनी सांगितले.
यातून
मार्ग कसा काढला जाऊ शकतो, हे सांगताना कुलकर्णी म्हणाले,
'सध्या सर्वत्र विविध व्यवहार सुरळीत झाले आहेत. हॉटेल, मॉल, बाजारपेठ, दारूची दुकाने,
लग्न समारंभ सुरू आहेत. मात्र, वारीला परवानगी
दिली जात नाही. सरकारने वारकऱ्यांशी संवाद साधून काही नियम घालून परवानगी दिली
पाहिजे. दिवसा प्रवास करताना संसर्गाचा धोका वाटत असेल तर वारकरी रात्री प्रवास
करायला तयार आहेत. गावात न थांबता माळरानावर मुक्काम केला जाईल. ज्यांनी लसीचे
दोन्ही डोस घेतले आहेत, अशा निवडक वारकऱ्यांना परवानगी
द्यावी. असे नियम पाळण्यास वारकरी तयार आहेत, याचा सरकारने
विचार केला पाहिजे,' अशी मागणीही त्यांनी केली. या वेळी
रामायणाचार्य वासुदेव महाराज खेडकर, जिल्हा कार्याध्यक्ष जय
भोसले, पदाधिकारी मुकुल गंधे, मिलिंद
मोभारकर, गजेंद्र सोनवणे, गौतम कराळे
उपस्थित होते.
0 टिप्पण्या