लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
औरंगाबाद :डिझेल भाववाढ होत आहे. डिझेल भाववाढीमुळे एसटीला
दरदिवशी दोन कोटी रूपयांपेक्षा अधिक तोटा सहन करावा लागत आहे. यामुळे एसटी
प्रशासनासमोर आता प्रवासी तिकीट दरवाढीशिवाय पर्याय नाही. मात्र, एसटी तिकीट दरवाढीचा निर्णय हा
मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात येणार असल्याचे संकेत परिवहन मंत्री
अनिल परब यांनी
शुक्रवारी येथे दिले.
परब यांनी चिकलठाणा कार्यशाळेसह सिडको
बसस्थानकात तयार होणाऱ्या बसपोर्टच्या जागेची पाहणी केली. यानंतर सीबीएसची पाहणी
केली. त्यानंतर त्यांनी परिवहन अधिकारी आणि एसटी अधिकाऱ्यांची विभागीय आयुक्तालयात
बैठक घेतली. चिकलठाणा कार्यशाळेची पाहणी केल्यानंतर परिवहन मंत्र्यांनी
पत्रकारांशी संवाद साधला.
परब म्हणाले की, करोना काळामुळे एसटी विभागाला तोटा सहन
करावा लागला आहे. माल वाहतुकीसह पेट्रोल पंप सुरू करणे, एसटीच्या
बाहेरील ग्राहकांचे टायर रिमोल्डींग करणे असे पर्यायावर विचार सुरू असून या
माध्यमातून उत्पन्नवाढ करण्याचे नियोजन सुरू करण्यात आलेले आहे. आगामी काळात
प्रवासी वाढ झाल्यानंतर एसटीचा तोटा कमी होण्यास मदत मिळेल अशी अपेक्षा आहे.
डिझेल भाववाढीबाबत विचारले असता, परब यांनी सांगितले की, एसटीला डिझेल भाववाढीमुळे दररोज कोट्यवधी रूपयांचे नुकसान होत आहे. एसटीला
प्रवासी तिकिटवाढ करण्याशिवाय गत्यंतर नाही. ही दरवाढ अपरिहार्य आहे. मात्र,
त्याबाबत आधी शासनाकडून मंजुरी घेतली जाणार आहे. या मंजुरीनंतर
एसटीचे तिकीट दरवाढ जाहीर केली जाईल. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर
चेन्नै, विभाग
नियंत्रक अरूण सिया, कार्यशाळा व्यवस्थापक किशोर सोमवंशी आदी
या प्रसंगी उपस्थित होते.
एसटीचे
खासगीकरण नाहीच
वयोमर्यादा संपलेल्या साडेतीन
हजार एस टी बस काढल्या
जाणार आहेत. त्याजागी नवीन बस देण्याबाबत प्रस्ताव सुरू आहे. पहिल्या टप्प्यात
चारशे बस भाडे तत्वावर घेतल्या जातील. नंतरच्या काळात नवीन बसही एसटी कार्यशाळेत
बांधणीसाठी दिल्या जातील. एसटीचे कोणत्याही प्रकारचे खासगीकरण करण्याचा आमचा विचार
नसल्याचे परब यांनी स्पष्ट केले.
राज्य शासनाने राज्यातील सर्व
महामंडळांच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला आहे. एसटी महामंडळात वेतन
करार करण्यात येत आहे. या करारामुळे एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळू शकत
नसल्याची माहितीही परब यांनी दिली.
0 टिप्पण्या