*पंकजा मुंडे यांच्या भूमिकेनंतर पुन्हा तर्कवितर्क
* पंकजा मुंडे कधीही पक्ष
सोडणार नाहीत, चंद्रकांत
पाटील यांनी दिली सावध प्रतिक्रिया
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात
खासदार प्रीतम मुंडे यांची वर्णी न लागल्यानं मुंडे भगिनी नाराज असल्याची चर्चा
होती. त्यांच्या अनेक समर्थकांनी पक्षाच्या पदाचे राजीनामे देण्याची भूमिका घेतली
होती. या सर्व समर्थकांचे राजीनामे पंकजा मुंडे यांनी काल फेटाळले. आपण कष्टानं
उभं केलेलं हे घर आहे. ते आपण का सोडायचं? ज्या दिवशी छत अंगावर पडेल किंवा इथं राम राहिला नाही असं वाटेल तेव्हा
पुढचा निर्णय घेऊ,' असं त्यांनी म्हटलं होतं. त्यांच्या याच
वक्तव्याचा धागा पकडत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते 'टीव्ही ९' या वृत्तवाहिनीशी बोलत होते.
' भारतीय जनता पक्ष वाढवण्यात
अनेकांचं योगदान आहे. मात्र, गोपीनाथ मुंडेंनी कार्यालयातील
संघटना रस्त्यावर आणली. संघटनेला संघर्ष करायला शिकवलं. त्यामुळं त्यांचं योगदान
वेगळं आहे. अशा घरात जन्मलेल्या पंकजाताई कधीच बंडाचा विचार करणार नाहीत. एखादी
गोष्ट आवडली नाही तर कार्यकर्त्यांना भावना व्यक्त करण्याचा आधिकार आहे,' असं पाटील म्हणाले.
' प्रीतमताईंना मंत्रिमंडळात घेतलं जायला हवं होतं असं कार्यकर्त्यांना वाटत
होतं. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा हे खूप बारकाईनं विचार करून निर्णय
घेत असतात. पद्म पुरस्कारांच्या बाबतीत आपल्याला हे दिसून येईल. मोदींनी ही
पद्धतही बदलली आहे. त्यांनी लोकांकडून नॉमिनेशन मागवलेत. गेल्या सात वर्षांत
लोकांना शोधून शोधून पद्म पुरस्कार दिले गेले आहेत. त्या माणसांनाही याची कल्पना
नव्हती. राजकारणातही ते असंच काम करत आहेत. संघटनात्मक जबाबदारी असेल किंवा
मंत्रिपदाची जबाबदारी देणं असेल, मोदीजी शोधून शोधून लोकांना
न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत,' असं पाटील म्हणाले.
' एखाद्याला न्याय मिळाला, तर दुसऱ्यावर अन्याय होतोच. सर्वांना एकाच वेळी न्याय मिळू शकत नाही. डॉ. भागवत कराड यांना मंत्रिपद मिळालं, पंकजाताईंना नाही मिळालं. नारायण राणेंना मिळालं, रणजीत
निंबाळकरांना नाही मिळालं. १२ जणांचे राजीनामे घेतले, ४०
जणांना निवडायचं होतं. कार्यकर्त्यांनी रिअॅक्ट होणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे. पण
यातून सावरणं हा समंजसपणा आहे. पंकजाताईंना तो काल दाखवला. परिपक्वता दाखवून
त्यांनी सर्वांना सांभाळून घेतलं,' अशा शब्दांत पाटील यांनी
पंकजाताईंचं कौतुक केलं.
0 टिप्पण्या