लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नगर : चांदबीबी महाल परिसरात पुन्हा एकदा बिबट्या फिरत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर वन विभागाने नेमक्या कोणत्या भागात बिबट्या आहे, याचा शोध सोमवारी सुरू केला. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून या भागात बिबट्याचे वास्तव्य असून, पावसामुळे आता गवत आणि झुडपांमध्ये वाढ झाल्यामुळे या भागात फिरायला येणार्यांनी दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
चांदबीबी महाल परिसरात यापूर्वी दोन-तीनवेळा बिबट्याचे दर्शन झालेले आहे. या भागात पहाटेपासून सकाळी उशीरापर्यंत आणि सायंकाळीही उशीरापर्यंत फिरायला येणार्यांची संख्या मोठी आहे. हा भाग बराचसा वन विभागाचा असल्याने येथे गर्दी करण्यास तशी मनाई आहे. मात्र नागरिकांना फिरण्यासाठी मोकळी जागा नसल्याने येथे विरोध केला जात नाही. मागे एकदा भल्या सकाळी तर एकदा सायंकाळी बिबट्याचे दर्शन झाले होते. ऊस तोडणीच्या काळात जिल्ह्यासह शेजारच्या जिल्ह्यांमध्येही बिबट्यांची संख्या वाढली होती.
त्याने केलेल्या हल्ल्यात अनेकांना यामुळे जीव गमवावा लागला. त्याच काळात चांदबीबी महाल परिसरातही बिबट्या दिसल्याने हा परिसर काही दिवसांसाठी लोकांना येण्यास बंद केला होता. मात्र कालांतराने तो पुन्हा खुला करण्यात आला.
रविवारी सायंकाळी काही तरूण महालावर गेले असताना वाहनाच्या उजेडात त्यांना समोर बिबट्या दिसला. बराचवेळ तरूणांना त्याचे दर्शन झाले. त्याची व्हिडिओ क्लिप रात्रीच सोशल मीडियावर व्हायरल झाली. सकाळी या भागात फिरायला जाणारेही यामुळे सावध झाले. तसेच वन विभागानेही तातडीने पावले उचलली.
वनमित्र मंदार साबळे यांनी वन विभागाच्या अधिकार्यांशी संपर्क साधला. तसेच ज्या तरूणांना बिबट्या दिसला त्यांच्याशी संपर्क केला. त्यांच्याकडून मिळालेली माहिती वन विभागाच्या अधिकार्यांना देण्यात आली आहे. बिबट्या नेमक्या कोणत्या भागात आहे, याचा शोध वन विभागाकडून घेतला जात आहे.
तसेच पाऊस झाल्याने गवत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. झुडपांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे जास्त सावधगिरी बाळगण्याची गरज व्यक्त केली जात आहे. व्यायाम व फिरण्यासाठी येणार्या नागरिकांनी याची दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
बिबट्याचा याच पट्टयात मुक्काम
मागे काही महिन्यांपूर्वी चांदबीबी महालावर आढळलेला बिबट्या व त्याची पिल्ले याच भागात अजूनही कायम असल्याचे बोलले जाते. या भागात बिबट्यापासून झालेली हानी जास्त प्रमाणात नसल्याने त्याची चर्चा नव्हती. मात्र बिबट्या याच भागात तेंव्हापासून फिरत असल्याचा संशय वन विभागालाही आहे.
0 टिप्पण्या