लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
सातारा: रेंगडेवाडी येथे एकाच कुटुंबातील चौघे जण वेन्ना नदीच्या पुरात वाहून गेले आहेत. रात्री उशिरापर्यंत यापैकी कुणाचाही शोध लागू शकलेला नाही. दरम्यान, एका महिलेला वाचवण्यात मात्र यश आले आहे.
हे चौघेजण
पुरात वाहून गेले...
१. सहदेव गणपत कासुर्डे (६०)
२. भागाबाई सहदेव कासुर्डे (५०)
३. तानाबाई किसन कासुर्डे (५०)
४. रविंद्र सहदेव कासुर्डे (३०)
कोयना नदीकाठच्या गावांना केले सतर्क
साताऱ्यात गेल्या तीन दिवसांपासून संततधार पाऊस पडत
आहे. त्यामुळे धरणांची पाणीपातळीही वाढत आहे. आज कोयना धरणात ७२ टीएमसी पाणीसाठा
झाला आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक मोठी आहे.
उद्या २३ जुलै रोजी सकाळी १० वाजता कोयना धरणातून १० हजार क्युसेक्स पाण्याचा
विसर्ग नदीपात्रात करण्यात येणार आहे. त्यामुळे कोयना नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क
रहावे, असे आवाहन पालकमंत्री
बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.
२८ गावांचा
संपर्क तुटला
महाबळेश्वर शहर व परिसरात जोरदार पाऊस कोसळत असून
गेल्या २४ तासांमध्ये तब्बल २९ इंच इतकी पावसाची नोंद झाली आहे. आजअखेर तब्बल ११०
इंच पावसाची नोंद झाली असून गुरुवारी दिवसभरात दहा इंचाहून अधिक पाऊस पडला
असल्याचा अंदाज आहे. मुसळधार पावसाने सर्वच रस्ते जलमय झाले होते.
महाबळेश्वर-पांचगणी मुख्य रस्त्यावर वेण्णालेक नाजीक पाणीच पाणी झाले असल्याचे
पहायला मिळाले. रस्त्यावर आलेल्या पाण्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या
होत्या. वेण्णा लेक ते लिंगमळा परिसरही जलमय झाला होता. अनेकांच्या घरात व परिसरातील
हॉटेल्समध्येही पाणी शिरले. महाबळेश्वर-प्रतापगड रस्त्यावरील धबधबे ओसंडून वाहत
असून घाटरस्ता धोकादायक बनला आहे. महाबळेश्वर तालुक्यातील चतुर बेट व उचाट पूल
पाण्याखाली गेल्याने २८ गावांचा संपर्क तुटला आहे.
0 टिप्पण्या