लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
पुणे: मनसे अध्यक्ष राज यांनी आगामी महापालिका निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. नाशिक दौऱ्यानंतर राज
सध्या पुण्यात असून व्यस्त कार्यक्रम असूनही त्यांनी वेळात वेळ काढून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेतली व त्यांच्या
प्रकृतीची विचारपूस केली. ही भेट एका खास कारणामुळे चर्चेत आली आहे.
राज्यात
करोनाने शिरकाव केल्यानंतर या संकटासोबतच कोविड
नियमांचे बंधनही सर्वांवर आले. यात मास्क सर्वांनाच
बंधनकारक करण्यात आलेला आहे. मात्र, राज ठाकरे यांनी या
नियमाला नेहमीच फाटा दिल्याचे आजवर पाहायला मिळाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला मास्क न लावता राज गेले होते. त्यानंतर
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यातही
राज यांच्या तोंडावर मास्क नव्हता. मी मास्क लावणार नाही, अशी
भूमिका त्यांनी वेळोवेळी घेतलेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज मात्र राज
यांच्यावर मास्क लावण्याची वेळ आली आणि राज यांच्या तोंडावर मास्क पाहून सगळेच
अवाक् झाले.
काय आहे मास्क लावण्यामागे ‘राज’ कारणही तसे खास-राज
पुणे
दौऱ्यात बाबासाहेब पुरंदरे यांच्या
भेटीला गेले. पुरंदरे यांचे घर पर्वती भागात असून तिथे पोहचल्यावर मास्क लावूनच
राज यांनी पुरंदरे यांची भेट घेतली. पुरंदरे यांचं वय व प्रकृतीच्या कुरबुरी या
बाबी लक्षात घेत राज यांनी मास्कचा दंडक तिथे पाळला. तेथे दोहोंत काहीवेळ चर्चा
रंगली. त्यानंतर राज तिथून निघाले. कारमध्ये बसताना राज यांनी आपल्या तोंडावरील
मास्क काढला होता. उपस्थित सर्वांना हात उंचावून दाखवत राज तिथून निघाले.
बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रकृतीच्या काळजीपोटी राज यांनी मास्क लावल्याचे
सांगण्यात येत आहे.
दरम्यान, बाबासाहेब पुरंदरे आणि ठाकरे कुटुंबाचे फार जुने ऋणानुबंध
आहेत. त्यातही शिवशाहीर पुरंदरे हे राज यांच्यासाठी पितृतुल्य आहेत. त्यामुळे
पुण्यात जाणे असेल तर राज हे आवर्जुन पर्वती भागात जाऊन बाबासाहेबांची भेट घेतात.
कोविड काळात अशी भेट झाली नव्हती. मात्र राज यांनी आज आवर्जुन शिवशाहीर पुरंदरेंची
भेट घेतली.
0 टिप्पण्या