नागरदेवळेतील शिबीरात 378 जणांची नेत्र तपासणी
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
अहमदनगर : फिनिक्स फाऊंडेशनने कोरोनाच्या संकटकाळात सर्वसामान्यांना आधार दिला. समाजाची गरज ओळखून कोरोना काळात मोफत शिबीर राबवून अनेकांच्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया घडवून आल्या. निस्वार्थ भावनेने फिनिक्सची अविरतपणे सुरु असलेली आरोग्य सेवा प्रेरणादायी असल्याची भावना महापौर रोहिणी शेंडगे यांनी व्यक्त केली.
फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने नागरदेवळे (ता. नगर) येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले. शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी महापौर शेंडगे बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा लेबर फेडरेशनचे अध्यक्ष अर्जुनराव बोरुडे, महाराष्ट्र राज्य टंकलेखन संघटनेचे अध्यक्ष प्रकाश कराळे, फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे, बाबासाहेब धीवर, राजेंद्र बोरुडे, गौरव बोरुडे, डॉ. विशाल घंगाळे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात जालिंदर बोरुडे यांनी फिनिक्स फाऊंडेशन दृष्टीदोष असलेल्या वंचित घटकातील रुग्णांची मागील 26 वर्षापासून सेवा करीत आहे. अनेक गरजू रुग्णांना आधार देण्याचे कार्य सुरु असून, नेत्रदान व अवयवदान चळवळीत देखील योगदान देण्यात आले आहे. अनेक दृष्टीहीनांना नेत्रदानाच्या माध्यमातून नवदृष्टी मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.
अर्जुनराव बोरुडे म्हणाले की, घरची परिस्थिती बेताची असून देखील जालिंदर बोरुडे यांनी आपल्या आईच्या प्रेरणेने आरोग्य सेवेचे महायज्ञ अविरतपणे सुरु ठेवले आहे. समाजात निस्वार्थ भावनेने काम करण्याची दानत असावी लागते. या दातृत्वच्या भावनेने व कोणत्याही प्रकारचा समाजसेवेचा बडेजावपणा न करता बोरुडे यांची सेवा सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रकाश कराळे यांनी फिनिक्स फाऊंडेशन ग्रामीण भागातील अनेक दृष्टीदोष असलेल्या गरजूंसाठी दीपस्तंभ ठरला. अनेकांना या चळवळीच्या माध्यमातून नवदृष्टी मिळून अंधकारमय जीवन उजळले. महागडी उपचार पध्दती सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेरची गोष्ट असून, फिनिक्स फाऊंडेशन देत असलेले योगदान कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
गावातील संत सावता महाराज मंदिर येथे घेण्यात आलेल्या या शिबीरात 378 रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. ओमकार वाघमारे, किरण कवडे यांनी रुग्णांची तपासणी केली. 73 गरजू रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे .
यावेळी गरजूंना मोफत नंबरचे चष्मे वाटप करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करता शासनाच्या नियमांचे पालन करुन हे शिबीर घेण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब धीवर यांनी केले. आभार गौरव बोरुडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुशील थोरात, सौरभ बोरुडे, ओंकार वाघमारे, डॉ. संजय शिंदे आदींनी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या