Ticker

6/Breaking/ticker-posts

आषाढी यात्रा : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अशी होईल विठुरायाची शासकीय महापूजा

 






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 पंढरपूर : करोनाच्या संकटात सलग दुसऱ्या वर्षी विठुरायाच्या शासकीय महापूजेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबियांसह येणार असून यावेळी केवळ ४५ ते ५० महत्त्वाच्या व्यक्ती आणि अधिकारी मंदिरात उपस्थित राहणार असल्याची माहिती मंदिराचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे. आषाढी एकादशीच्या २० जुलै रोजी मुख्यमंत्री पहाटे २ वाजण्याच्या सुमारास विठ्ठल मंदिरात येणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा होणार आहे .


यावेळी विठ्ठल गाभारा आणि चौखांबीमध्ये केवळ मुख्यमंत्र्यांचे कुटुंबीय, मानाचा वारकरी आणि मंदिरातील पुजारी एवढेच उपस्थित असणार असून मागे सोळखांबीमध्ये मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगी दिलेले व्हीआयपी, अधिकारी आणि मंदिर समिती सदस्य उपस्थित असतील. महापूजेस मंदिरात येणाऱ्या प्रत्येकाची RTPCR तपासणी केलेली असून केवळ रिपोर्ट निगेटिव्ह असणाऱ्यांनाच उपस्थित राहता येणार आहे.

महापूजेनंतर मंदिर समितीने केलेल्या विठुरायाच्या नवीन प्रतिमांचे अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते केले जाणार आहे. यानंतर संत कान्होपात्राचे पहिले मंदिरातील वृक्ष साठून गेल्याने नवीन रोपट्याचे रोपण मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते केले जाईल. मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा सत्कार विठ्ठल सभामंडपात होणार असून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मानाच्या वारकऱ्याचाही सन्मान येथे केला जाणार असल्याचे जोशी यांनी सांगितले. आषाढी एकादशीला मुख्यमंत्री पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी मंदिरात येणार असून पहाटे साडेचार वाजेपर्यंत हा सर्व कार्यक्रम पार पडणार आहे .


चंद्रभागेत स्नानाला मनाई, चंद्रभागा झाली बंदिस्त

करोनाच्या संकटात होत असलेल्या आषाढी यात्रेला भाविकांनी येऊ नये यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून आजपासून पंढरपूर शहरासह परिसरातील १० गावात संचारबंदीला सुरुवात झाली आहे. सध्याच्या करोना संकटामुळे यंदाची आषाढी मर्यादित स्वरुपात साजरी होत असल्याने बाहेरच्या कोणत्याही भाविकाला पंढरपुरात प्रवेश दिलेला नाही. मात्र आषाढी एकादशी दिवशी पंढरपूरमधील भाविकांनीही चंद्रभागेत स्नानाला जाऊ नये, यासाठी चंद्रभागेचे सर्व घाट लोखंडी बॅरेगेंटिंग लावून बंद करण्यात आल्याने आता चंद्रभागा बंदिस्त झाली आहे. चंद्रभागेत प्रवेश करणारे सर्व घाट आणि मार्गांवर लोखंडी बॅरेगेंटिंग लावून मोठा पोलिस बंदोबस्त या घाटांवर ठेवण्यात आला आहे. यामुळे शासनाने परवानगी दिलेल्या १० मानाच्या पालखी सोहळ्यातील ४०० वारकऱ्यांनाच केवळ चंद्रभागेत पादुका स्नानासाठी सोडले जाणार आहे. आषाढी एकादशीला या सर्व पादुकांना चंद्रभागेच्या पात्रता स्नान घालण्याची परंपरा आहे. तेवढ्याच वारकऱ्यांना चंद्रभागेपर्यंत जाता येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या