लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
बीड: केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात परळीच्या भाजपच्या खासदार प्रीतम
मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना जागा न मिळाल्यामुळे आक्रमक समर्थकांनी
राजीनाम्याचा सत्र सुरू केलं आहे. पंकजा समर्थक आणि बीड भाजप जिल्हाध्यक्ष
राजेंद्र मस्के हे 77 पदाधिकार्यांचे राजीनामे घेऊन
थेट मुंबईला रवाना झाले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्या पंकजा मुंडे या
बैठक घेत पदाधिकार्यांशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे या बैठकीत पंकजा मुंडे
समर्थकांना काय सांगणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
अधिक माहितीनुसार, मंगळवारी पंकजा मुंडे यांनी मुंबईत पदाधिकाऱ्यांची बैठक
बोलावली आहे. वरळीतील कार्यालयात या बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून यावेळी पंकजा
मुंडे समर्थकांशी काय बोलणार? त्यांची समजूत काढण्यात पंकजा
यांना यश येणार का? याबद्दल राजकीय चर्चा सुरू आहे.
खरंतर आत्तापर्यंत भाजपच्या 50 हून अधिक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. अशात आता मस्के हे 77 पदाधिकार्यांचे राजीनामे घेऊन मुंबईला निघाले आहेत. त्यामुळे ही भाजपसाठी मोठी चिंतेची बाब आहे. यावर पंकजा मुंडे यांनी काल दिल्लीवारी केली. यावेळी त्यांनी भाजपच्या बड्या नेत्यांशी भेटीगाठी केल्या. त्यामुळे उद्याच्या बैठकीत त्या यावर काही माहिती देतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
0 टिप्पण्या