Ticker

6/Breaking/ticker-posts

‘देवा आता करोनाचे संकट नष्ट होऊ दे, पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे’ - मुख्यमंत्री

 *आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची सपत्नीक महापूजा संपन्न

*विणेकर शिवदास कोलते आणि इंदुबाई कोलते हे दाम्पत्य मानाचे वारकरी



लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 पंढरपूरः पंढरपुरात आज आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल आणि रुक्मिणीची विधीवत महापूजा करण्यात आली. पंरपरेला अनुसरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सपत्नीक महापूजा केली. आज पहाटे ३ वाजून ४० मिनिटांनी विठ्ठल रखुमाई यांची शासकीय महापूजा करण्यात आली. यावेळी विठ्ठल मंदिरातील विणेकर शिवदास कोलते आणि इंदुबाई कोलते या दाम्पत्य मानाचे वारकरी ठरले.

पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे, भक्तीरसात टाळ-मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरू होऊ दे. यासाठी देवा आता करोनाचे संकट नष्ट होऊ दे. माझ्या महाराष्ट्राला आरोग्य संपन्नता लाभू दे, असं साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विठुरायाच्या चरणी घातले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, पुन्हा एकदा सर्वांना आनंदी आणि निरोगी आयुष्य जगू दे. कोरोनाच्या काळात नागरिकांच्या वतीने पाळण्यात येणारे सामाजिक अंतर मिटवू दे, वारकऱ्यांनी तुडूंब,आनंददायी, भगव्या पताक्यांनी भरलेलं पंढरपुर पहावयाचे आहे, असेही मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले. आज मंदिरात मी वृक्षारोपण केले. हा परंपरेचा वृक्ष असून याची पाळेमुळे जगभरात आणखी घट्ट होतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

महापूजेनंतर मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीच्या छायाचित्राचे अनावरण करण्यात आले. मंदिर समितीने या छायाचित्राचे पुस्तक स्वरुपात जतन करुन हा वारसा जगापुढे ठेवावा, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गाहिनाथ औसेकर यांनी केले तर सूत्रसंचालन मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी केले

आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी सोमवारी रात्री उशिराने सर्वच मानाच्या संतांच्या पालख्या पंढरीत दाखल झाल्या तर मुख्यमंत्रीही उशिराने पंढरीत आले. टाळ-मृदंगाच्या गजरात विना केवळ ४०० वारकरी भक्तांचे उपस्थितीत आज मंगळवारी आषाढी एकादशीचा सोहळा रंगणार आहे. पंढरपूरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे संताच्या पादुकांचे स्वागत देखील यंदा पंढरीत वारकर-यांच्या अनुपस्थित झाले.

करोना संसर्गामुळं मोजक्या लोकांच्या उपस्थितित महापूजा पार पडली. यावेळी विठुरायाच्या गाभाऱ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मानाचे वारकरी आणि ठराविक पुजारी यांच्या उपस्थितीत शासकीय पूजा पार पडली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या