Ticker

6/Breaking/ticker-posts

मीराबाईनं रचला इतिहास.. 'जिंकलस पोरी'! राष्ट्रपती, पंतप्रधानांसह मीराबाईवर कौतुकाचा वर्षाव..!

 







लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

पुणे : टोकियो ऑलिम्पिकच्या दुसऱ्याच दिवशी भारताला पहिले पदक मिळाले. 49  किलो वजनी गटात वेटलिफ्टर मीराबाई चानूने रौप्य पदकाला गवसणी घातली आणि देशात आनंदाची लाट पसरली. मीराबाईने स्नॅच आणि क्लीन अँड जर्कमध्ये एकूण 202 किलो वजन उचलून ऑलिम्पिक पदक पक्के केले. मीराबाईच्या घवघवीत यशानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, "वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक जिंकत  टोकियो  ऑलिम्पिक2020 मध्ये भारतासाठी चांगली सुरवात करून दिल्याबद्दल मीराबाई चानू यांचे मनापासून अभिनंदन."

तर पंतप्रधान मोदींनी अभिनंदन करताना म्हटले आहे की, ''यापेक्षा टोकियो ऑलिम्पिकची आनंदी सुरुवात होऊ शकत नाही. मीराबाई चानू यांनी चमकदार कामगिरी केली. वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. त्यांचे यश प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देईल."

 



केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनीही ट्विट करत मीराबाईचे अभिनंदन केले त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, ''टोकियो ऑलिम्पिक उद्घाटनानंतरच्या पहिल्या दिवशी भारताचे पहिले पदक. मीराबाईंनी महिलांच्या 49 किलो वजनी गटात वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक जिंकले. मीरा तुमचा देशाला अभिमान आहे."

मीराबाई ज्या राज्यातील आहेत त्या मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनीही मीराबाईंचे अभिनंदन केले आहे. भारतासाठी मोठा विजय. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने खाते उघडले. मीराबाई चानूने रौप्य पदक जिंकले. तुम्ही आज देशाचा गौरव केला आहे, असे बिरेन सिंह यांनी म्हटले आहे.

रौप्यपदक जिंकल्यानंतर देशभरातून मीराबाईवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही मीराबाईचे अभिनंदन केले. ' भारताला आपल्या मुलीचा अभिमान आहे,' असे राहुल गांधींनी म्हटले आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवागनेही मीराबाईचे अभिनंदन केले. 'अद्वितीय वेटलिफ्टिंग... दुखापतीनंतर ज्याप्रकारे स्वत:ला बदलले आणि भारताला ऐतिहासिक रौप्यपदक मिळवून दिले, ते नक्कीच शानदार आहे. भारताला अभिमान वाटावा अशी कामगिरी केली. अभिनंदन,' असे सचिनने म्हटले आहे, तर 'भारतीय नारी सर्वांवर भारी! मीराबाई चानू हे नाव लक्षात ठेवा. सर्वांना अभिमान वाटावा अशी कामगिरी करत ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले. अजून खूप जिंकायचं आहे,' असं सेहवागने म्हटलं आहे.

माजी क्रिकेटपटू व्ही.व्ही.एस.लक्ष्ण, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, बीसीसीआयचे सचिव जय शाह तसेच दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता महेश बाबू यांनीही मीराबाईने रौप्यपदक जिंकल्याबद्दल तिचे अभिनंदन केले आहे. मीराबाईचे कुटुंबीय, शेजारी, नातेवाईक यांनी सामना सुरू झाल्यापासून टीव्हीसमोर ठाण मांडले होते. मीराबाईने पदक जिंकताच मणिपूरमध्ये आनंदोत्सवाला सुरवात झाली आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या