लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नाशिक : राज्यात मुसळधार पावसाने
हाहाकार माजवला आहे. अनेक दिवसांपासून पावसाची संततधार काही थांबण्याचं नाव घेत
नाहीये. त्यामुळे अनेक जिल्ह्यांना पुराचा धोका निर्माण झाला असून काही गावांचा
संपर्क तुटला आहे. नाशिकमध्ये मुसळधार पावसाने गोदावरी नदीला रात्रीच्या पावसाने
पूर आल्याचं समोर आलं आहे.
सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे धरणाचं
पाणी न सोडताच नाल्याचं पाणी शहरांत शिरल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण
झाला आहे. गोदाघाटावर मोठ्या प्रमाणात नाल्याचे पाणी साचल्यामुळे नजीकच्या
गावांनाही पालिकेने इशारा दिला आहे. खरंतर,
महापालिकेने नालेसफाईचे काम न केल्याने तीन तेरा वाजले आहेत.
नाशिक
जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यातील अनेक भागांत तुफान पाऊस कोसळत
असल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्र्यंबकेश्वरच्या बाजारपेठेत पुराचे पाणी
शिरले असून त्र्यंबकेश्वर मंदिरातही सध्या पाणी असल्याचे सांगण्यात आले आहे.
दुसरीकडे सूरगाणा तालुक्यातही नदी नाले दुथडी भरून वाहत असून झगडपाडा गावाजवळ
असलेल्या शिवनदी पुलावर पाणी आल्याने डझनभर गावांचा संपर्क तुटला आहे.
नाशिक
जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपासूनच पावसाचा जोर वाढला असून आजही दिवसभर पाऊस कोसळत
होता. या पावसाचा मोठा फटका त्र्यंबकेश्वरला बसला आहे. त्र्यंबकेश्वर शहरात पुराचे
पाणी शिरले असून बाजारपेठ जलमय झाली आहे तर त्र्यंबकेश्वर मंदिरातही पाणी शिरले
आहे. त्र्यबंकेश्वरमधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
0 टिप्पण्या