*भाजप आमदार
प्रसाद लाड यांचा खुलासा
*'शिवसेना
भवन फोडणार असं म्हणालोच नव्हतो'
*शिवसेनाप्रमुखांबद्दल
आम्हाला नेहमीच आदर - प्रसाद लाड
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
मुंबई: वेळ पडल्यास 'शिवसेना भवन फोडू' असं वक्तव्य
भाजपचे विधान परिषदेतील आमदार प्रसाद लाड यांनी केल्याचं वृत्त काल माध्यमांनी प्रसारित झालं होतं. त्याचे तीव्र
पडसाद उमटून राडे होण्याची शक्यता लक्षात येताच लाड यांनी तात्काळ खुलासा केला
आहे. ' शिवसेना भवन' फोडणार असं मी
म्हणालोच नव्हतो, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.
मुंबईतील शिवसेना भवनाच्या वास्तूजवळ
असलेल्या भाजप कार्यालयात काल पक्षाच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.
त्यावेळी आमदार नीतेश राणे यांच्यासह भाजपचे नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. त्यावेळी झालेल्या भाषणात लाड
यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. त्यांच्या भाषणाच्या बातम्या
माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. ' आम्ही माहीममध्ये
आलो की 'शिवसेना भवन' फोडायलाच आलो की
काय असं काही लोकांना वाटतं. पण वेळ आल्यास तेही करू,' असं
त्यांनी म्हटल्याचं प्रसिद्ध झालं होतं. त्यावर लाड यांनी एका व्हिडिओ ट्वीटच्या
माध्यमातून स्पष्टीकरण दिलं आहे.
' टीव्ही चॅनेल्स व इतर काही
माध्यमांनी माझ्या भाषणाचा विपर्यास केला आहे. मी शिवसेना भवन फोडण्याची भाषा
केल्याचं म्हटलं जातंय, ते साफ चुकीचं आहे. भाजपच्या
कार्यकर्त्यांनी घाबरण्याचं कारण नाही, जेव्हा जेव्हा 'आरेला कारे' होईल, तेव्हा 'कारेला आरे'नं उत्तर दिलं जाईल, असं मी म्हणालो होतो. ' माझं म्हणणं इतकंच होतं की,
आम्ही माहीममध्ये येतो तेव्हा इतका पोलीस बंदोबस्त असतो की जणू
आम्ही शिवसेना भवन फोडायला आलो आहोत. त्या पलीकडं मी काहीच बोललो नव्हतो. माझ्या
वक्तव्याचा विपर्यास करून बातम्या दाखवल्या गेल्या,' असं लाड
यांनी म्हटलं आहे.
' मला
शिवसेनाप्रमुखांचा किंवा शिवसेनाप्रमुखांनी बांधलेल्या वास्तूचा अनादर मुळीच
करायचा नव्हता. शिवसेनाप्रमुखांवर आम्ही प्रेम करतो, कुठल्याही
पक्षात असलो तरी शिवसेनाप्रमुखांचा आदर करतो. त्यामुळं शिवसेनाप्रमुखांच्या 'शिवसेना भवन'बद्दल माझ्याकडून कुठलंही चुकीचं
वक्तव्य केलं जाणार नाही. तरीही कोणाचं मन दुखावलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो,'
असं लाड यांनी म्हटलं आहे.
0 टिप्पण्या