लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
जळगाव:पिंप्राळ्यातील कोळी कुटुंबियांच्या घरातील चार महिला जमिनीवर
झोपलेल्या… तीन पुरुष पलंगावर झोपलेले…
भल्या पहाटे या भरल्या घरात कोब्रा नागाने प्रवेश केला…सापाच्या फुत्काराच्या आवाजाने घरातील तरुणास पहाटे तीन वाजता जाग आली…
आणि घरातील दृश्य पाहून त्याची पाचावर धरण बसली… एका मोठ्या कोब्रा जातीच्या सर्पाशी घरातील पाळीव मांजर झुंजत होती. तरुणाने घरातील इतर सदस्यानांही उठवले. त्यानतंर त्यांनी
घराजवळच राहणाऱ्या सर्पमित्राला बोलावून घेतल्याने सर्पमित्राने सर्प पकडून
मांजरासह सर्पाचेही प्राण वाचविले.
शहरातील पिंप्राळा परिसरातील प्रशांत चौक भागात
राहणाऱ्या अनंत कोळी यांचे कुंटूबिय बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे झोपले होते.
पहाटे घरात कोळी यांच्या मुलाला घरात फुत्कारण्याचा आवाज आला. पहिल्यांदा दुर्लक्ष
केल्यानंतर पुन्हा हा आवाज वाढतच गेला. त्या आवाजाच्या दिशेने जात तरुणाने तेथे
पाहिले असता, घरातील पाळीव
मांजर तीन ते चार फुटाच्या कोब्राचा मार्गावर थांबून त्याच्याशी झुंजत असल्याचे
दिसले. हे दृश्य पाहून त्याला धक्का बसला. त्याने तातडीने घरातील इतर कुटूंबियांना
आवाज देवून जागी केले.
यावेळी
अनंत कोळी यांच्या घरातील चार महिला या जमिनीवरच झोपल्या होत्या. त्या देखील
खळबळून जाग्या झाल्यात. त्यांनीही पाहीले तर जवळच पाळीव मांजरीने कोब्राचा पुढे
जाणारा मार्ग अडवून ठेवला होता. कोब्राच्या फुत्कारण्याला मांजर देखील फिस्करत
होती तसेच पंजा उगारुन सर्पाला रोखून धरत होती.
घरातील सदस्यांनी शेजारीच राहणाऱ्या वन्यजीव संरक्षण
संस्थेचे सर्पमित्र गणेश सोनवणे यांना तातडीने बोलावून घेतले. सोनवणे आपले सहकारी
अजय साळवे यांना घेऊन ताबडतोब घटनास्थळी आले. सोनवणे यांनी कोब्रा सर्पाला
सुरक्षित रित्या पकडले. त्यानतंर कुटुंबियांनी सुटकेचा श्वास सोडला. सकाळी
सर्पमित्रांनी कोब्राला सुरक्षित अधिवासात सोडले. दरम्यान आज दिवसभर
पिंप्राळ्यातील या घटनेची विशेषत: त्या पाळीव मांजरीने कोब्रा सर्पाशी केलेल्या
झुंजीची जोरदार चर्चा सुरु होती.
0 टिप्पण्या